Vidhan Parishad: "महाविकास आघाडीत राहायचं का? याचा विचार करावा लागेल", काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यानं मोठी खळबळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 08:18 AM2022-06-21T08:18:51+5:302022-06-21T08:19:26+5:30
Vidhan Parishad Election 2022: राज्याच्या विधान परिषदेच्या निकालात भाजपानं महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला. त्यानंतर सत्ताधारी पक्षामध्ये नाराजी नाट्य सुरू झालं आहे.
Vidhan Parishad Election 2022: राज्याच्या विधान परिषदेच्या निकालात भाजपानं महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला. त्यानंतर सत्ताधारी पक्षामध्ये नाराजी नाट्य सुरू झालं आहे. शिवसेनेत मोठा भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच आता काँग्रेसनंहीमहाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याबाबत संकेत देण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये राहायका का? याचा आता विचार करावा लागेल असा निर्वाणीचा इशारा काँग्रेस नेते नसीम खान यांनी दिला आहे.
निवडणूक निकालानंतर नाराजीनाट्य, एकनाथ शिंदे 'नॉट रिचेबल'; बैठकीला अनुपस्थित राहणार?
"काँग्रेसचा दलित मागासवर्गीय पहिल्या पसंतीचा उमेदवार पडतो हे दुर्दैवी आहे. आता आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. वेळ अशी आली आहे की सरकारमध्ये राहायला हवं की नको याचा विचार करायला हवा. कुठली मतं कुठं गेली हे सांगणं योग्य नाही. पण ती फुटलीत हे नक्की. किमान समान कार्यक्रमाच्या माध्यमातून समर्थन देण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. प्रत्येक पक्षाला पक्षवाढीची मुभा राहिल असं ठरवण्यात आलं होतं. आज आमच्या समर्थनामुळे हे सरकार चालू आहे. पण आमच्या पक्षातच नाराजी आहे हे निकालावरुन स्पष्ट झालं आहे. यावर बैठक घेऊन विचार करू. सरकारमध्ये राहून काँग्रेसला काय मिळतंय हे पाहणं देखील महत्वाचं आहे. आमचा पहिल्या पसंतीचा उमेदवार पडतो म्हणजे फक्त आमचीच जबाबदारी नाही. सर्वांची जबाबदारी आहे. दिल्लीचे नेते निर्णय घेतील", असं काँग्रेस नेते नसीम खान म्हणाले.
नसीम खान यांनी काँग्रेसमधील नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधून काँग्रेस आता बाहेर पडणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे. भाजपानं दिलेल्या धक्क्यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे शिवसेनेचीही मतं फुटली आहेत. त्यामुळे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी आज आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. पण त्याआधीच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे काल संध्याकाळपासूनच नॉट रिचेबल आहेत. त्यांच्यासोबत शिंदे समर्थक १२ आमदारांशी देखील संपर्क होऊ शकत नसल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडते की काय अशी चर्चा होत आहे. एकनाथ शिंदे नाराज असून ते आजच्या बैठकीला उपस्थित राहणार का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे. दुसरीकडे आपला सहकारी पक्ष काँग्रेस देखील नाराज असल्यानं सरकार टिकवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.