मुंबई-
महाविकास आघाडी सरकारमधील नाराजी आज सर्वांसमोर आली आहे आणि आजच्या निकालानं रोज सकाळी बोलणारा पोपट आता तरी गप्प बसेल, अशी प्रतिक्रिया भाजपाचे पाचवे विजयी उमेदवार प्रसाद लाड यांनी दिली आहे. महाविकास आघाडीला चितपट करत भाजपाचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपाचे चार उमेदवार निवडून येतील असं मताधिक्य पक्षाकडे होतं. पण पाचव्या जागेसाठी चढाओढ होती. यात प्रसाद लाड यांनी बाजी मारत महाविकास आघाडीला 'दे धक्का' दिला आहे. या विजयानंतर प्रसाद लाड यांनी शिवसेनेवर शरसंधान केलं.
"आजचा निकाल खूप काही सांगून जाणारा आहे. राज्यसभेपेक्षा अधिक मतं यावेळी भाजपाला मिळाली आहेत. मला शिवसेनेच्या उमेदवारांपेक्षाही जास्त मतं मिळाली आहेत. त्यामुळे रोज सकाळी बोलणारा पोपट आता तरी गप्प बसेल. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आतातरी लक्षात येईल की बोलणाऱ्या पोपटाचा गळा दाबला पाहिजे नाहीतर असा घात होतो. अकेला देवेंद्र क्या कर सकता है, असं बोलणाऱ्यांना देवेंद्रजींची जादू पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे", असं प्रसाद लाड म्हणाले.
प्रसाद लाड यांना शिवसेनेपेक्षा जास्त मतंभाजपाचे पाचव्या क्रमांकाचे उमेदवार असलेल्या प्रसाद लाड यांना विधान परिषद निवडणुकीत २८ मतं मिळाली. तर शिवसेनेच्या सचिन अहिर आणि आमश्या पाडवी यांना प्रत्येकी २६ मतं मिळाली आहेत. तसंच भाजपाच्या श्रीकांत भारतीय आणि राम शिंदे यांना सर्वाधिक ३० मतं मिळाली. तसंच प्रवीण दरेकर यांना २९ मतं मिळाली. तसंच उमा खापरे यांना २७ मतं मिळाली आहेत.