Vidhan Parishad Election: 'सरकार म्हणून आता विचार करण्याची गरज'; बाळासाहेब थोरातांचं मोठं विधान, पराभवानं निराश!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 11:39 PM2022-06-20T23:39:57+5:302022-06-20T23:55:59+5:30
विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसल्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी महत्वाचं विधान केलं आहे.
मुंबई-
विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसल्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी महत्वाचं विधान केलं आहे. अडीच वर्ष सत्तेत राहूनही पक्षाची मतं फुटत असतील तर सरकार म्हणून आम्हाला विचार करण्याची गरज आता आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा आज पराभव झाला. तर दुसऱ्या पसंतीचे नेते भाई जगताप दुसऱ्या फेरीत निवडून आले. काँग्रेसला आपल्या एकूण ४४ मतांपैकी ४१ पहिल्या पसंतीची मतं मिळाली. त्यामुळे तीन मतं फुटल्याचं उघड झालं आहे. याचबाबत बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली
'रोज सकाळी बोलणारा पोपट आता तरी गप्प बसेल'; प्रसाद लाड यांचा राऊतांवर निशाणा
"आपल्याच पक्षाची मतं जर फुटत असतील तर दुसऱ्यांना दोष देऊन काय उपयोग? इतरांना दोष देण्याचा मुद्दाच नाही. आम्हालाच आता विचार करण्याची गरज आहे. अडीच वर्ष सत्तेत राहूनही जर आमदारांमध्ये नाराजी असेल तर नेमकं कुठं चुकतंय याचा विचार करण्याची गरज आहे. नक्कीच आजच्या निकालाची माहिती पक्ष नेतृत्वापर्यंत पोहोचवली जाईल", असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
'मविआ'तील नाराजीवर काय म्हणाले थोरात?
शिवसेना, राष्ट्रवादीनं काँग्रेसला मदत केली नाही असं विचारण्यात आलं असता बाळासाहेब थोरात यांनी या दोन्ही पक्षांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही असं विधान केलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीनं आम्हाला मदत केली नाही असं मी अजिबात म्हणणार नाही. कारण आमच्याच पक्षाची जर मतं फुटत असतील तर इतरांबाबत मी बोलू इच्छित नाही. काँग्रेससाठी नक्कीच हे निराशाजनक आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.