विधानपरिषदेच्या १० जागांसाठी २० जूनला मतदान होणार आहेत. राज्यसभेच्या निकालात महाविकास आघाडीला धक्का बसल्यानंतर, आता विधान परिषद निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी सतर्कता बाळगली आहे. या निवडणुकीत १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. यात भाजपाने ५ तर महाविकास आघाडीतर्फे ६ उमेदवार आहेत. खरे तर, संख्याबळ नसतानाही काँग्रेसने या निवडणुकीत अतिरिक्त दुसरा उमेदवार उभा केला आहे. काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवाराला ८ ते १० मतांची गरज आहे. तर भाजपालाही पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांची गरज भासणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
याच बरोबर, शिवेसेनेकडे अतिरिक्त मते आहेत, ज्यांची आवश्यकता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना आहे, अशा स्थितीत शिवसेना काय निर्णय घेणार? यावरही सर्वांचेच लक्ष आहे. यासंदर्भात माध्यमांनी विचारले असता, शिवसेना नेते तथा विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे म्हणाले, "महाविकास आघाडी विधान परिषद निवडणुकीला सामोरे जात आहे. आम्ही एकत्रितपणे ही निवडणूक लढवत आहोत आणि या बाबतीत मत कुणाला कुणाचे द्यायचे, किती कोटा ठरवायचा, या बाबतीत आघाडीचे नेते ठरवतील आणि त्यावर अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील."
याशिवाय, या निवडणुकीत शिवेसेचे दोन्ही उमेदवार विजयी होतील, एवढे मताधिक्य शिवसेनेकडे आहे. त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होती, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.
आमदारांचा मुक्काम हॉटेलांमध्येशिवसेनेचे आमदार शुक्रवारी पवईतील हॉटेलकडे रवाना झाले. भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादीचे आमदारही शनिवारपासून वेगवेगळ्या ठिकाणी असतील.