मुंबई : विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधी भाजप सदस्यांनी कामकाजावर बहिष्कार टाकत जोरदार घोषणाबाजी केली. विधानसभेच्या पायऱ्यांवरच त्यांनी प्रतिरूप अधिवेशन भरवले. विधान भवनात विनापरवाना माईक, स्पीकर आणून विरोधकांनी तेथेच भाषणबाजी केली. त्याला आक्षेप घेताच भाजप सदस्यांनी दिवसभर पत्रकार कक्षातच मुक्काम ठोकला. या गोंधळातच अधिवेशनाचे सूप वाजले. (Vidhan sabha adhiveshan End of assembly session in commotion )दुसरीकडे सत्ताधारी पक्षांनी विविध विधेयके सभागृहात सादर केली. १२ आमदारांचे निलंबन कायम ठेवण्यावर सत्ताधारी पक्षांचे एकमत झाले आहे. फडणवीस यांच्या काळातील फोन टॅपिंगची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आश्वासन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. सरकारने शेतकऱ्यांसाठी तीन विधेयके सादर केली. केंद्राचा शेतकरी कायदा कसा जाचक आहे, यावर भाषणे केली. केंद्राचे कायदे योग्य होते तर त्यावर भाष्य करण्यासाठी भाजप सदस्य सभागृहात का आले नाहीत, असा सवाल सत्ताधाऱ्यांनी केला. मात्र त्याचे उत्तर देण्यासाठीही भाजप सदस्य सभागृहात आले नाहीत. नागपूर येथील हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होईल, अशी घोषणा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी केली. कोरोनामुळे गेल्या वर्षी नागपुरात हिवाळी अधिवेशन होऊ शकले नव्हते.
आमदारांचे निलंबन कायम ठेवण्यावर एकमत!भाजपाच्या ‘त्या’ १२ आमदारांचे निलंबन कायम ठेवण्यावर महाविकास आघाडीमधील तीनही पक्षांच्या नेत्यांचे मंगळवारी एकमत झाले. याच कालावधीत विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यासाठी राज्यपालांनीच तारीख ठरवून दिली पाहिजे असा नियम आहे. त्यामुळे यावरूनही आता वेगळे राजकारण रंग घेईल.
केंद्राच्या कृषी कायद्यांवर राज्याची कुरघोडी- केंद्राने आणलेले तीन कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या नाही तर फक्त मूठभर उद्योगपतींच्या फायद्याचे आहेत. - यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होईल असे सांगत सरकारने यात सुधारणा करणारी तीन विधेयके सादर केली. - ही तिन्ही विधेयके जनता, शेतकरी व सामाजिक संस्था, संघटनांना देऊ. त्यांच्याकडून सूचना व हरकती मागवू, असेही सरकारने विधानसभेत सांगितले.
युतीच्या चर्चेवर पूर्णविराम; "तीस वर्षे एकत्र असून काही घडले नाही, आता काय होणार"- तीस वर्षे युतीत एकत्र होतो, तरी काही झाले नाही. तर, आता काय होणार, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना-भाजप युतीच्या चर्चांवर पूर्णविराम लावला. शिवाय, आता महाविकास आघाडीत माझ्या एका बाजूला काँग्रेस आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी आहे. यातून मी कुठे कसा जाणार, असा मिश्किल सवालही त्यांनी केला. - मुख्यमंत्री ठाकरे यांनी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर त्यांची भाजपसोबत जवळीक वाढल्याच्या चर्चा सुरू आहेत. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला मिश्किलपणे टोलवतानाच त्यांनी युतीच्या चर्चांवर मात्र पूर्णविराम लागले.
...तर पंतप्रधानांच्या योजनांत घोटाळा : मुख्यमंत्रीओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकारकडे डाटा देण्याची मागणी ठरावाद्वारे केली. यात विरोधकांना मिरच्या झोंबण्यासारखे आणि आकांडतांडव करण्यासारखे काय होते, असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी उपस्थित केला. तसेच केंद्राकडील डाटामध्ये आठ कोटी चुका असल्याचे विरोधक म्हणत आहेत. तसे असेल तर याच डाटावर चालविल्या जाणाऱ्या केंद्र सरकारच्या विविध योजनांमध्ये घोटाळा, गडबड झाली म्हणायचे का, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.१८ जणांचे निलंबन केले असते : अजित पवारराज्यपालांनी बारा आमदारांची नियुक्ती रखडविल्याने भाजपच्या बारा सदस्यांचे निलंबन केलेले नाही. सभागृहात आणि अध्यक्षांच्या दालनात गोंधळ घालणारे बारा जण होते म्हणून तितक्यांचे निलंबन झाले. तेथे १८ जण असते त्यांच्यावर कारवाई केली असती, असे सांगत निलंबनाची कारवाई ठरवून केली नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.