तोवर शिवतारेंना अभय? पक्ष कधी कारवाई करणार? संजय शिरसाटांनी सांगितली 'वेळ'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 03:29 PM2024-03-26T15:29:03+5:302024-03-26T15:29:27+5:30
Sanjay Shirsat on Vijay Shivtare: आता जागावाटपाची चर्चा सुरू झाली आहे. उमेदवारांची बदली आणि जागांबाबत लवकरात लवकर पक्षाचे नेतृत्व निर्णय घेईल. परवा ही यादी जाहीर केली जाईल, असे शिरसाट म्हणाले.
माजी आमदार विजय शिवतारे अजित पवारांविरोधात सातत्याने भुमिका घेत असल्याने महायुतीत तणावाचे वातावरण आहे. याची नाराजी देखील अजित पवारांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शिवतारेंना समज दिली होती. तरीही शिवतारे सुनेत्रा पवारांना बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याविरोधात भुमिका घेत असून लोकसभेला अपक्ष उभा राहणार असल्याचे जाहीर केले आहे. यावर शिवतारेंवर निलंबन किंवा हकालपट्टीची कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात होती. परंतु अद्याप यावर कारवाई झालेली नाही.
शिवतारेंवर पक्ष कारवाई कधी करणार असा प्रश्न विचारला असता आमदार संजय शिरसाट यांनी जेव्हा शिवतारे अपक्ष म्हणून फॉर्म भरतील तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबद्दल कडक भूमिका घेतील, असा इशारा दिला आहे. शेवटी लोकशाही आहे. जर काही कार्यकर्त्यांना अपक्ष लढायचे असेल तर तो लढू शकतो. आतापर्यंत काही लोकांनी फॉर्म भरलेला नाही. जेव्हा हे लोक अपक्ष अर्ज भरतील तेव्हा शिंदे त्यांच्याबाबक कठोर भूमिका घेतली, असे शिरसाट म्हणाले आहेत.
शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणार असल्यावर छेडले असता त्यांना जागा सुटत नव्हती. शेवटी ते महायुतीच्या सरकारमध्ये येत आहेत. राष्ट्रवादी पक्ष असो की कोणताही पक्ष असो ते आमच्या महायुतीच्या सरकारमध्ये येत आहेत. परंतु चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांचा वाद गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहे. आमचा आणि त्यांचा ह्या वादामध्ये काही संबंध नाही असे शिरसाट यांनी स्पष्ट केले.
आता जागावाटपाची चर्चा सुरू झाली आहे. उमेदवारांची बदली आणि जागांबाबत लवकरात लवकर पक्षाचे नेतृत्व निर्णय घेईल. परवा ही यादी जाहीर केली जाईल, असे शिरसाट म्हणाले.