मुंबई : माजी मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नेते विनय कोरे यांची जनसुराज्य आघाडी आज भाजपाच्या महाआघाडीमध्ये सहभागी झाली. त्यामुळे आता रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्रामनंतर पाचवा पक्ष भाजपाच्या महाआघाडीचा घटक बनला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील आणि स्वत: कोरे यांच्या उपस्थितीत भाजपाच्या प्रदेश कार्यालयात ही घोषणा करण्यात आली. आपण भाजपासोबत कोणत्याही वैयक्तिक अटींविना आणि अपेक्षेविना जात असल्याचे कोरे म्हणाले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपली आज सकाळी चर्चा झाली. साखरेला जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळण्यासह शेतकरी हिताचे विविध मुद्दे आपण मांडले आणि त्यास मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, असे कोरे म्हणाले. कोरे हे कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा समूहाचे सर्वेसर्वा आहेत. आपण भाजपासोबत जाणार असलो तरी नगरपालिका, जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीत आपल्या पक्षाचे उमेदवार कमळावर लढणार नाहीत, असे कोरे यांनी पत्र परिषदेत स्पष्ट केले. गेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीतच आपण भाजपासोबत जाणार होतो पण स्थानिक समीकरणांमुळे तेव्हा निर्णय घेता आला नाही, असे ते म्हणाले. कोरे सोबत आल्याने भाजपाला मोठे बळ मिळाले असल्याचे दानवे म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)
विनय कोरे भाजपासोबत
By admin | Published: October 27, 2016 1:28 AM