रत्नागिरी: काही दिवसांपूर्वी अलीकडेच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या (Veer Savarkar) मुद्द्यावरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधक भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या. मात्र, आता पुन्हा एकदा वीर सावरकर यांचा मुद्दा उपस्थित झाला असून, भाजप आणि शिवसेना आमनेसामने आले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांवरून भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली होती. या टीकेला शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आले असून, सावरकर प्रश्नी देवेंद्र फडणवीसांचे रडगाणे सुरू आहे, त्यांच्याशी आम्हाला देणघेण नाही, असा टोला लगावण्यात आला आहे.
वीर सावरकरांच्या विषयावर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेनेला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दांत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी टीका केल्यानंतर शिवसेनेकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. देवेंद्र फडणवीसांना शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यापूर्वीही अनेकदा वीर सावरकरांवरून भाजप आणि शिवसेनेत खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले असून, आता पुन्हा तोच वाद सुरू झाला आहे.
सावरकर प्रश्नी देवेंद्र फडणवीसांचे रडगाणे सुरु
वीर सावरकर प्रश्नी देवेंद्र फडणवीसांचे रडगाणे सुरू आहे, त्यांच्याशी आम्हाला देणघेण नाही. अशा शब्दांत विनायक राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. शिवसेनेचे जे दोन खासदार निलंबित झालेले आहेत, त्यातील अनिल देसाई अद्याप दिल्लीत गेलेले नाहीत. तर, प्रियंका चतुर्वेदी यांनी वीर सावरकरांबद्दल एक चकार शब्द काढला नाही. उलट सीपीएमचे खासदार जे कोणी बोलले आहेत, त्यांच्याविरोधात प्रियंका चतुर्वेदींनी आवाज उठवला आणि आम्ही सगळ्यांनीच त्याचा धिक्कार केला. तरीही देवेंद्र फडणवीस यांचे रडगाणे सुरू आहे, त्याच्याशी आम्हाला देणंघेणं नाही, असा पलटवार विनायक राऊत यांनी केला.
दरम्यान, आता भाजपचा वेगळा भगवा सांगावा लागत आहे. शिवसेनेला भगव्याचा मान, आणि सन्मान राहिला नाही. वीर सावरकरांचा दररोज अपमान करणाऱ्यांसोबत शिवसेना मांडीला मांडी लावून बसली आहे. संसदेत माफी मागा म्हटल्यावर माफी मागायला आम्ही सावरकर आहोत का? असे बोलताना निर्लज्जांनो तुम्हाला लाज वाटली पाहिजे, अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.