जागृतीचा प्रभाव : आतापर्यंत ६६ टक्के मतदान
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या आठव्या टप्प्यात बुधवारी सात राज्यांतील ६४ जागांवर सरासरी ६४ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत झालेल्या ५०२ जागांवरील मतदानाच्या टक्केवारीने १९८४चा विक्रम मोडीत काढला आहे. त्या वेळी याच जागांवर एकंदरीत ६४ टक्के, तर यंदा ६६.२७ टक्के मतदान झाले आहे. शेवटच्या टप्प्यात १२ तारखेला ४१ जागांसाठी मतदान होईल. यंदाच्या निवडणुकीतील आजवरच्या मतदानातून महिला मतदारांची हक्काची जाणीव अधोरेखित झाली आहे. अरुणाचल प्रदेश, चंदिगढ, तामिळनाडू, ओडिशा, पंजाब व मेघालय यासह १३ राज्यांमध्ये मतदानाचा हक्क बजावणार्यांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक आहे. शिवाय आंध्र प्रदेशात ७३.४६ ही यंदाची टक्केवारी सर्वाधिक ठरली आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंड या पर्वतीय राज्यांतही गेल्या वेळेपेक्षा अधिक मतदानाची नोंद झाली आहे. बुधवारच्या आठव्या टप्प्यात बिहार व आंध्र प्रदेशातील हिंसाचाराच्या काही घटना वगळता अन्यत्र मतदान शांततेत पार पडले. या टप्प्यात राहुल गांधी, वरुण गांधी, स्मृती इराणी, श्रीनिवास रेड्डी, डी. पुरंदेश्वरी, रामविलास पासवान, राबडीदेवी, राजीव प्रताप रुडी, मोहंमद कैफ यांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात बंद झाले. पश्चिम बंगालमध्ये विक्रमी ८१.२८ टक्के, तर जम्मू-काश्मीरमध्ये ४९.९८ टक्के मतदानाची नोंद झाली. बिहारमध्ये समाजकंटकांनी मतदान केंद्र लुटण्याचा प्रयत्न केला. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक जण ठार झाला.