सावंतवाडी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाचे संकेत दिले असले, तरी आठ दिवस थांबा. ईश्वरी संकेत वेगळे आहेत, अशी भविष्यवाणी राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी वर्तविली आहे. आठ दिवसांत मोठ्या घडामोडी घडतील, अशी पुष्टीही त्यांनी याला जोडली. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य राघोजी सावंत, नारायण राणे, प्रकाश परब आदी उपस्थित होते.मंत्री केसरकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकासासाठी निधी येणार आहे. अनेक कामे प्रस्तावित केली आहेत. बांधकाम विभागाच्या रस्त्यावर ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत तेथे खड्डे भरण्यासाठी कोणताही ठेकेदार पुढे येत नाही. त्यामुळे आता बांधकाम विभाग स्वत:च हे खड्डे भरेल, असे मंत्री केसरकर यांनी जाहीर केले. याबाबतचे आदेश सावंतवाडी बांधकाम विभागाला दिले आहेत. तर कणकवली बांधकाम विभागाने प्रस्ताव पाठविला तर त्यांनाही असे आदेश दिले जातील, असेही त्यांनी सांगितले.महाराष्ट्र स्वाभिमान जिल्ह्यात आपल्याकडे जास्त ग्रामपंचायती आल्याचा दावा करीत आहे. मात्र हा त्यांचा दावा खोटा आहे. शिवसेना-भाजपाच सर्वत्र पुढे आहे. तसेच मंत्री केसरकर यांनी सावंतवाडी तालुक्यात जास्तीत जास्त ग्रामपंचायती शिवसेनेच्या विचारांच्या असल्याचे सांगितले. कोणी कितीही दावे केले तरी त्याला काही अर्थ नाही. सत्य हे सत्यच असते. मी तर ग्रामपंचायत निवडणुकीत फिरलो नाही. मात्र आमदार नीतेश राणे वगैरे फिरले, तरी त्यांच्या ग्रामपंचायत कमी आल्या आहेत, असे सांगितले. लवकरच मी सर्व सरपंच, उपसरपंच यांच्या भेटी घेणार असल्याचेही ते म्हणाले.माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाबाबतचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यावर मंत्री केसरकर म्हणाले, आठ दिवस थांबा. ईश्वरी संकेत वेगळे आहेत, असे सांगत मंत्री केसरकर यांनी राणे यांचा मंत्रिमंडळ प्रवेश होणार नसल्याचे संकेत दिले आहेत. पण यामागचे कारण त्यांनी सांगण्यास नकार दिला आहे.
आठ दिवस थांबा, ईश्वरी संकेत वेगळे आहेत, राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशावर केसरकरांचे सूचक वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2017 9:55 AM