‘फॉरेन्सिक’च्या अहवालाची प्रतीक्षा

By Admin | Published: March 5, 2015 12:24 AM2015-03-05T00:24:44+5:302015-03-05T00:24:58+5:30

पोलीस महासंचालक : पिस्तूल किती होत्या हे अस्पष्टच

Waiting for the forensic report | ‘फॉरेन्सिक’च्या अहवालाची प्रतीक्षा

‘फॉरेन्सिक’च्या अहवालाची प्रतीक्षा

googlenewsNext

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हल्ल्यामध्ये जी पिस्तूल वापरण्यात आली, त्याच्या तपासणीचा फॉरेन्सिक लॅबचा अहवाल शासनास अजून मिळालेला नाही. त्यामुळे पिस्तूल एक होती की दोन यासंबंधी आताच काही सांगणे योग्य होणार नाही, असे राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.या हल्ल्याप्रकरणी आम्ही विविध तांत्रिक मुद्द्यांचा अभ्यास करत आहोत. त्या परिसरातील मोबाईल कॉल्सची तपासणी केली आहे. फॉरेन्सिक व हत्यारासंबंधीचा अहवालही आमच्याकडे या क्षणापर्यंत आलेला नाही. त्यामुळे हत्यारे कोणती वापरली यासंबंधी खात्रीपूर्वक माहिती देता येत नाही. हल्लेखोरांचे रेखाचित्र काढले आहे, परंतु जोपर्यंत उमा पानसरे यांनी हल्लेखोर असेच दिसणारे होते, अशी खात्री दिल्याशिवाय ते रेखाचित्रही आम्हाला प्रसिद्धीस देता येत नाही. जी मोटारसायकल कागल तालुक्यात कालव्यात सापडली, ती वर्षभरापासून चोरीस गेल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. त्या गाडीचे रनिंग सात ते आठ हजार किलोमीटर झाले आहे. तिची सीट बदलली आहे. मूळ मालकाने ती कुणाला विकली व तिचा वापर पुढे कसा झाला, यासंबंधीची माहिती आम्ही घेत आहोत, असे महासंचालक दयाळ यांनी सांगितले.


शेजाऱ्यांनो, माहिती देण्यास पुढे या...
पानसरे यांच्या हल्लेखोरांसंबंधी त्यांचे शेजारी व त्या परिसरातील लोकांनी माहिती देण्यासाठी पुढे यावे, त्यांच्याबाबतीत आवश्यक ती सर्व गोपनीयता आम्ही पाळू. त्यांनी दिलेली माहितीच या तपासात महत्त्वाची ठरू शकेल, असे आवाहन पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत केले. दयाळ म्हणाले, ‘आजूबाजूच्या नागरिकांनी हल्लेखोरांसंबंधी माहितीचे काहीतरी धागेदोरे सांगितल्यास त्यातून तपासास वेग येऊ शकेल. आम्ही त्यासाठी यापूर्वीही सगळ््यांना आवाहन केले होते. आताही या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने पुन्हा ते करत आहे. शासनाने हल्लेखोरांसंबंधी माहिती देणाऱ्यास २५ लाख व कोल्हापूर पोलिसांनी पाच लाख रुपयांचे बक्षीस यापूर्वीच जाहीर केले आहे.’

नागरिकांनी तपासास सहकार्य करावे : दयाळ
कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्यास शासनाकडून २५ लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. त्याचबरोबर कोल्हापूर पोलिसांनीही पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. या हत्येसंदर्भात काही माहिती मिळाल्यास नागरिकांनी पोलिसांना सांगावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे; तसेच त्याला बक्षीसही गुप्त पद्धतीने दिले जाईल. महत्त्वाची माहिती मिळाल्यास त्वरित मोबाईल क्र. ९७६४००२२७४ व ०२३१-२६५४१३३ यावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी केले आहे.

Web Title: Waiting for the forensic report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.