शिर्डीचे (Shirdi) माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिंदे गटातून परतत ठाकरे गटात प्रवेश केला आणि ठाकरे सेनेतील वातावरण ढवळून निघाले आहे. गद्दारांना पुन्हा शिवसेनेत घेणार नाही, निघून गेलेले आमदार, खासदार पुन्हा निवडून येता कामा नये असे उद्धव ठाकरेंनी सांगितले होते. परंतू, त्याच लोकांना ठाकरे गटात परत घेतल्याने शिंदेंच्या फुटीवेळी ठाकरेंसोबत राहिलेले नेते नाराज होऊ लागले आहेत.
आठ दहा महिन्यांपूर्वी ठाकरे यांनी हे निघून गेलेले आमदार, खासदार पुन्हा निवडून येता कामा नये असे मला सांगितले होते. त्यांनी मला अमरावती किंवा शिर्डी यापैकी एका जागेची निवड करण्यासाठी सांगितले होते. मी शिर्डीची निवड केली. संपर्कप्रमुख झाल्यावर चांगली तयारी केली. परंतू, गद्दार वाकचौरेंना परत ठाकरे गटात घेतल्याने मी उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे, असे सांगत बबन घोलप यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे.
उद्धव ठाकरे यांचा दौरा मला कळवण्यात आला नाही. भाऊसाहेब वाकचौरे गद्दार हे शिवसेना सोडून गेले होते. पण त्यांना पक्षात घेतले गेले. वाकचौरे आता प्रचार करत असताना कार्यकर्ते संभ्रमात आहेत. त्यांना जर उमेदवार करायचे होते, तर मला का सांगितलेले असा रोखठोक सवाल घोलप यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या दुष्काळी पाहणी दौऱ्यात वाकचौरे यांनाच पुढे पुढे करण्यात आले. सामनामध्ये माझं संपर्कप्रमुखपद काढून घेतल्याचे छापून आले. म्हणून मी उद्धव ठाकरेंना WhatsApp वर राजीनामा पाठवला आहे. त्यांनी मला उद्या बोलावले आहे. मी ५५ वर्षे झाले, शिवसेनेत काम करत आहे. त्यांनी मला काढून टाकावं, मी बाहेर जाणार नाही, असे घोलप यांनी स्पष्ट केले.
वाकचौरे यांना परत का घेतले गेले? मिलिंद नार्वेकर असं का करत आहेत? भुजबळ यांना देखील शिवसेनेत यायचे होते. मी ठाकरे यांना सांगून ते थांबवलेले. एक वर्षापूर्वीची ही घटना आहे. भुजबळ यांनी माझ्यावर, राज ठाकरे यांच्यावर केसेस दाखल केल्या होत्या. ज्यांची गरज नाही, त्यांना घेतलं जात आहे. ज्यांची गरज आहे, त्यांना डावललं जात आहे, अशी टीका घोलप यांनी ठाकरेंवर केली आहे.