लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई/ ठाणे/ नवी मुंबई/ रायगड/ पालघर : मागील काही दिवसांपासून अधूनमधून बरसणाऱ्या पावासाने मुंबईसह ठाणे जिल्ह्यात गुरुवारी दमदार हजेरी लावली. आता मुंबईसह अन्य जिल्ह्यांना पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात पुढील २ दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
ठाणे शहरात साचले पाणीठाणे शहरातील गटारे व नाल्यांची सफाई व्यवस्थित न झाल्याने पाणी तुंबले होते. वर्तकनगरात घराची शेड कोसळली आहे. यात कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. मीरा-भाईंदर, उल्हासनगर, अंबरनाथ बदलापूर तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पावसाने दमदार हजेरी लावली.
रायगडमध्ये पावसाचे धुमशानअलिबाग - रायगड जिल्ह्यात गुरुवारी अनेक ठिकाणी जास्त पाऊस पडला. राेहा तालुक्यातील कवाळटे केळघर येथे दरड काेसळली. त्यामुळे राेहा आणि मुरुड तालुक्यातील दळणवळणचा मार्ग बंद झाला. अलिबाग येथे सर्वाधिक १०४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती.
पालघरमध्ये दिवसभर संततधारपालघर : वसई-विरारसह जिल्ह्यामध्ये गुरुवारी सकाळपासून मुसळधार पावसाने पुन्हा हजेरी लावली. दुपारपर्यंत ही संततधार कायम होती. या पावसामुळे वसई-विरारच्या अनेक भागांत पाणी तुंबले होते.
नवी मुंबईत ७६ मि.मी. पावसाची नोंदनवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रात गुरुवारी पावसाची संततधार सुरू होती. दिवसभरात ७६ मिमी पावसाची नोंद झाली असून दोन ठिकाणी वृक्ष कोसळले आहेत. नवी मुंबईत पहाटेपासून सायंकाळपर्यंत पाऊस सुरुच होता.
मुंबईत झोडपधारांचा माराnमुंबई शहर आणि उपनगरात गुरुवारी सकाळच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. दुपारी ३ ते ५ या वेळेत कोसळलेल्या पावसाने मुंबईकरांना अक्षरश: धडकी भरविली. विशेषत: मुंबईच्या उपनगरातील सखल भागात पाणी साचते की काय, अशी स्थिती निर्माण झाली हाेती. मात्र सायंकाळी ५ नंतर पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास टाकला.
मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडील नोंदीनुसार, १६ जूनच्या सकाळी ८ वाजल्यापासून १७ जूनच्या सकाळी ८ वाजेपर्यंत सांताक्रूझ येथे १०२ मिलीमीटर पाऊस नाेंदवण्यात आला. तर एकूण ५ ठिकाणी बांधकामाचा भाग काेसळला.