अपार्टमेंट्समध्ये पाणीबचतीची मोहीम
By admin | Published: May 17, 2016 05:50 AM2016-05-17T05:50:41+5:302016-05-17T05:50:41+5:30
‘लोकमत’चे जलमित्र अभियान उपक्रमाच्या वृत्तांची दखल घेऊन राज्यातील विविध शहरांमध्ये पाणीबचतीसंदर्भात जागरूकता निर्माण होत
मुंबई : ‘लोकमत’चे जलमित्र अभियान उपक्रमाच्या वृत्तांची दखल घेऊन राज्यातील विविध शहरांमध्ये पाणीबचतीसंदर्भात जागरूकता निर्माण होत असून, अपार्टमेंट्स, गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पाणी वाचविण्याची जणू मोहीमच सुरू झालेली आहे. वाहनधारक आपली वाहने सप्ताहात एकदा किंवा दोनदा केवळ बादलीभर पाण्याचा वापर करून स्वच्छ करीत आहेत; तर घराघरामध्येही पाण्याचा कमीतकमी उपयोग करून कामे उरकली जात आहेत.
कोल्हापूर येथील प्रतिभा नगरमधील ‘यश इलिट’च्या सदनिकाधारकांनी दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर एक दिवसाआड बादलीतून पाणी घेऊन चारचाकी आणि दुचाकी वाहने धुण्याचा निर्णय घेतला. या सामुदायिक निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी गेल्या दीड महिन्यापासून सुरू आहे. यामुळे पाइपद्वारे वाहने धुण्यामुळे होणारा पाण्याचा बेसुमार अपव्यय टळला आहे. सरासरी ५० टक्के पाण्याची बचत होत आहे
सातारा येथे गृहिणींनी पाणीबचतीसाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. सिंक, बेसिनच्या पाइपची ड्रेनेजला असलेली जोडणी काढून तेथून भाजी किंवा तांब्या-पेले विसळलेले पाणी बादलीत साठवून त्याचा उपयोग गृहनिर्माण सोसायटीमधील बागेला पाणी देण्यासाठी करण्यात येत आहे. नंदा पिसाळ या गृहिणीने त्या करीत असलेला उपाय सांगितला. त्या म्हणाल्या की, घरातील टॉयलेटमधील फ्लश टँकमध्ये ५ लीटर पाणी बसते. बटण दाबले की सर्व पाणी वाहून जाते. आम्ही टँकमध्ये १ लीटरची प्लॅस्टिकची बाटली ठेवली आहे. त्यामुळे टँकमधील जागा कमी झाल्यामुळे ४ लीटर पाणी बसते आणि १ लीटरची बचत होत आहे.
सोलापुरातील होटगी रोड आणि विजापूर रोडवरील अनेक अपार्टमेंट्समध्येही पाणीबचतीसाठी अनेक उपाययोजना केल्याचे दिसून आले. या ठिकाणी घरेलू कामगारांना केवळ एका बादलीत भांडी धुण्याची सूचना दिली आहे. अनेक गृहिणींनी दररोज टॉवेल धुण्यासाठी देण्याचे बंद केल्याचेही सांगितले. (प्रतिनिधी)
वॉटरबॅगेतील पाण्याचे संकलन
डॉ. शीतल पाटील फाउंडेशनतर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील उचगाव येथे पारस प्ले अॅँड प्री-प्रायमरी स्कूल चालविले जाते. शाळेत ५० विद्यार्थी आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांनाही पाणीबचतीचे धडे दिले आहेत. शाळा सुटल्यानंतर वॉटर बॅगमधील शिल्लक पाणी एकत्र संकलित करण्याची व्यवस्था दोन महिन्यांपासून केली आहे. अशा प्रकारे संकलित झालेल्या पाण्यातून शाळेतील फरशांची स्वच्छता केली जाते किंवा झाडांना वापरले जात आहे.