बारामती : केंद्रात गेली सहा वर्ष यांचे सरकार आहे ,ठीक आहे आमच्याकडून चुका झाल्या. तर सहा वर्षात तुम्हाला त्या दुरुस्त करता आल्या नाहीत का,असा सवाल करीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे.
दिवसेंदिवस वाढत्या इंधनदराने सर्वसामान्य हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वीच पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीला यूपीए सरकारचं त्यावेळचे धोरण कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे. पवार माळेगाव बु (ता.बारामती) येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आहेत. या संस्थेच्या सभेसाठी पवार शनिवारी(दि २०) उपस्थित होते.यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामतीत पत्रकारांशी बोलताना हा टोला लगावला आहे.
दररोज वाढणाऱ्या इंधनदरवाढीच्या विषयावरुन केंद्र सरकार आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे.यात आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उडी घेतली आहे. केंद्र सरकारमध्ये सहा वर्षे सत्तेत असताना देखील चुका दुरुस्त करता येत नसेल, त्यावर चर्चा काय करायची ,असा टोला पवार यांनी लगावला आहे.त्यामुळे आगामी काही दिवसांत इंधन दरवाढ दिल्लीत चांगलीच तापणार असल्याची चिन्हे आहेत.