नवी मुंबई : आमचे सरकार असताना माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले. सत्ता पुन्हा आली असती तर उर्वरित प्रश्नही तत्काळ सोडविले असते. आता पुन्हा आम्हालाच संधी मिळणार असून, कामगारांचे सर्व प्रश्न मार्गी लावू, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या ८८ व्या जयंतीनिमित्त नवी मुंबईमध्ये कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार गणेश नाईक, मंदा म्हात्रे, शशिकांत शिंदे, प्रसाद लाड, निरंजन डावखरे व इतर मान्यवर उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, सत्ता असताना कामगारांच्या प्रश्नांवर कधीही राजकारण केले नाही. कामगार हिताचे अनेक निर्णय घेतले. प्रलंबित प्रश्न सोडविले. पुन्हा सत्ता आली असती तर शिल्लक प्रश्नही सोडविले असते.
केंद्रीय कामगारमंत्री भूपेंद्र यादव यांनी माथाडी कामगारांचे केंद्र सरकारशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच दिल्लीमध्ये बैठक आयोजित केली जाईल. त्या बैठकीत सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. केंद्र सरकारने ई-श्रम पोर्टल सुरू केले असून, आतापर्यंत १ कोटी ६० लाख नागरिकांची नोंदणी झाली आहे.