मुंबई : उष्णतेच्या लाटेने महाराष्ट्र होरपळला असतानाच दक्षिणपूर्व अरबी समुद्रात केरळ ते महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने बुधवारी ७ मार्च रोजी उत्तर, मध्य महाराष्ट्र, विदर्भात मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडील शनिवारच्या सकाळच्या साडेआठच्या नोंदीनुसार, मागील २४ तासांत गोव्यासह राज्यात हवामान कोरडे होते. विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात तर विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात वाढ झाली आहे.राज्यात सर्वात जास्त तापमान अकोला येथे ३९़५ अंश सेल्सिअस तर, सर्वात कमी तापमान अहमदनगर येथे १५़३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोवा, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.मुंबईचा विचार करता मुंबईकरांना मागील पाचएक दिवसांपासून उष्णतेच्या लाटेच्या झळा बसत आहेत. सलग दोन दिवस मुंबईचे कमाल तापमान ३७ अंश नोंदविण्यात आल्यानंतर सद्य:स्थितीत मुंबईचे कमाल तापमान ३४ अंशाच्या आसपास आहे. त्यामुळे मुंबईकर घामाघूम झाले आहेत.-४ ते ६ मार्चदरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.-७ मार्च रोजी मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल.-७ मार्च रोजी उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्रासह विदर्भात गारांचा पाऊस पडणार, हवामान विभागाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2018 12:49 PM