कऱ्हाड : येथील बारा डबरे परिसरातील पालिकेच्या कचरा डेपोत ‘बायो मायनिंग’चे काम सुरू आहे. त्या कामावरील लॉकडाऊनच्या काळात ४६ व १० लाखांची दोन बिले एकाच दिवशी तयार करून त्याच दिवशी आरटीजीएसद्वारे संबंधित ठेकेदारांस रक्कम देण्यात आली. त्यामागचे गौडबंगाल काय? इतकी मोठी रक्कम देताना कोणालाच विश्वासात न घेता ती अदा कशी झाली, त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांनी मासिक सभेत केली.
विजय वाटेगावकर म्हणाले, बायोमायनिंगचे एकूण ५६ लाखांचे बिल लॉकडाऊनच्या काळामध्ये एकाच दिवशी आरटीजीएसने अदा केले गेले. वास्तविक त्यातील काही कामांवर यापूर्वीच्या एका सभेत भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर व नगराध्यक्षा शिंदे यांनी आक्षेप नोंदविले होते. त्यानंतर तेच बिल लॉकडाऊनच्या काळात का दिले गेले. ते देताना सर्वसाधारण सभेसमोर का आणले नाही? ते बिल देण्यामागे काय गौडबंगाल आहे, याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. १४८ विषयांसाठी कऱ्डाह नगरपालिकेत यापूर्वी दोन सभा झाल्या आहेत. दोन सभांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर वादळी चर्चा झाली होती. दुसऱ्या सभेतही सर्व विषय न संपल्यामुळे सोमवारी तिसऱ्यांदा सभा घेण्यात आली होती.