राजकारणातल्या ‘मारूती कांबळे’चे काय झाले? - राधाकृष्ण विखे पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 10:34 PM2017-09-27T22:34:11+5:302017-09-27T22:34:31+5:30
सत्तारूढ पक्षाने निवडणुकीपुर्वी दिलेली आणि आता विसर पडलेल्या आश्वासनांबाबत त्यांना आठवण करून देताना ‘मारूती कांबळेचं काय झालं’ प्रश्न आम्ही नेहमी विचारतो. सामना चित्रपटात शेवटी या प्रश्नाचे उत्तर मिळते.
पुणे - सत्तारूढ पक्षाने निवडणुकीपुर्वी दिलेली आणि आता विसर पडलेल्या आश्वासनांबाबत त्यांना आठवण करून देताना ‘मारूती कांबळेचं काय झालं’ प्रश्न आम्ही नेहमी विचारतो. सामना चित्रपटात शेवटी या प्रश्नाचे उत्तर मिळते. मात्र, राजकीय चित्रपटात या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळाले नाही. तसेच सिंहासन चित्रपटात दाखविण्यात आलेल्या आणि आजच्या राजकीय स्थितीत साम्य असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
पुणे नवरात्रो महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागु यांना विखे पाटील यांच्या हस्ते महर्षी पुरस्कार बुधवारी प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अभिनेते प्रदीप वेलणकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. गणेश कला क्रीडा रंगमंच येथे झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर काँग्रसेचे नेते उल्हास पवार, मोहन जोशी, जेष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष, दीपा लागु, रजनी वेलणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, डॉ. सतीश देसाई, सिलाईचे दादा गुजर, वास्तुविशारद महेश नामपुरकर, महोत्सवाचे आयोजक आबा बागुल, जयश्री बागुल आदि उपस्थित होते.
सामना, सिंहासन, पिंजरा यांसह विविध चित्रपटांचा उल्लेख करून विखे पाटील म्हणाले, डॉ. लागु यांनी साकारलेल्या भुमिकांमुळे महाराष्ट्रातील रसिक समृध्द झाले आहेत. त्यांचे गारूड आजही रसिकांच्या मनावर आरूढ झाले आहे. देवाला रिटायर्ड करा, असे फक्त तेच म्हणू शकतात. इतर कोणी तसे धाडस करू शकणार नाही. इतिहास त्यांच्या उल्लेखाशिवाय लिहिला जाणार नाही.
समोरच्या कलाकाराच्या चांगल्या कामाचे कौतुक करणारे कलावंत अभावानेच पाहायला मिळत असल्याची खंत ज्योती सुभाष यांनी व्यक्त केली. दीपा लागु, वेलणकर यांनीही मनोगत व्यक्त केले. आबा बागुल यांनी प्रस्ताविक केले.
... हे त्रास देतेय
आपण कुठल्या परिस्थितीत वावरतोय हे कळत नाही. आपण नाटक बघतोय आणि बाहेर कुणीतरी भगवान असे म्हणत भीक मागत आहे. त्याचवेळी कुणीतरी दया येवून त्याला भीक देत असेल. हे मला खुप त्रास देणारे आहे. यावर कुणी उपाय सांगितला तर तो मला हवाय. आपण घेतलेल्या व्रताचा भंग करत राहणे हे जणू कर्तव्य असल्यासारखे करत राहिलो आहे, असे सतत वाटते, अशी भावना डॉ. श्रीराम लागु यांनी यावेळी व्यक्त केली.