आषाढीसाठी काय तयारी?
By admin | Published: June 11, 2015 01:22 AM2015-06-11T01:22:47+5:302015-06-11T01:22:47+5:30
पुढच्या महिन्यातील आषाढी एकादशीसाठी पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही, यासाठी नेमकी काय तयारी केली आहे,
मुंबई : पुढच्या महिन्यातील आषाढी एकादशीसाठी पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही, यासाठी नेमकी काय तयारी केली आहे, याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश उच्च न्यायायलाने बुधवारी राज्य शासनाला दिले.
विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी सुमारे १५ लाख भाविक पंढरपुरात दाखल होतात. पुढच्या महिन्यात २७ जुलैला आषाढी आहे. तेव्हा संपूर्ण राज्यातून १५ लाखांहून अधिक वारकारी पंढरपुरात येतील. मात्र त्यांची राहण्याची व शौचालयाची सोय शासन योग्य प्रकारे करीत नाही. यामुळे भाविकांना स्वत:लाच राहण्याची व्यवस्था करावी लागते. अजूनही पंढरपूरमध्ये मानवाकडून मानवी विष्ठा उचलली जाते, असा आरोप करीत वारकरी संघटनेने उच्च न्यायालयात अर्ज केला. वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी न्यायालयानेच शासनाला आदेश द्यावेत, अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे.
न्या. नरेश पाटील यांच्या खंडपीठासमोर या अर्जावर सुनावणी झाली. याचे प्रत्युत्तर सादर करताना मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी पंढरपूरमधील तयारीचा तपशील न्यायालयासमोर ठेवला.
पंढरपुरात चार हजार मोबाइल शौचालये दिली आहेत. अजून सहा हजार दिली जाणार आहेत. वारकऱ्यांना राहण्यासाठी मंदिरापासून अंदाजे दीड किमी अंतरावर १५ एकरांचा भूखंड शासन ताब्यात घेणार आहे, असे अॅड. वग्यानी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. (प्रतिनिधी)