धक्कादायक वास्तव! MPSC, UPSC मध्ये वारंवार अपयश आलेल्यांचे पुढे होते तरी काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 05:33 PM2022-06-15T17:33:44+5:302022-06-15T17:35:23+5:30
केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे ग्लॅमर दिवसेंदिवस वाढत असल्याच्या काळात तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्यादेखील वाढत आहे
वाशिम - अलीकडच्या काळात मोठ्या संख्येने विद्यार्थी, युवक हे एमपीएससी (महाराष्ट्र लोकसेवा आयोग), यूपीएससी (केंद्रीय लोकसेवा आयोग) परीक्षेकडे वळत आहेत. मात्र, प्रत्येकालाच यश येईल याची खात्री नसल्याने ‘अधिकारी’ होण्याच्या नादात कर्मचारी पदाच्या नोकरीवरही पाणी फिरण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे वेळीच सावध होत स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवतानाच, रोजगारासाठी दुसरा पर्यायही समोर ठेवावा, असा सल्ला शिक्षण तज्ज्ञ, मार्गदर्शकांनी दिला.
केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे ग्लॅमर दिवसेंदिवस वाढत असल्याच्या काळात तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्यादेखील वाढत आहे. काही लाख विद्यार्थी तयारी करतात, संधी मात्र हजारभर विद्यार्थ्यांनाच मिळते. तरीही परीक्षेचे आकर्षण कमी झालेले नाही. या स्थितीत उर्वरित विद्यार्थ्यांचे काय होते, हा औत्सुक्याचा भाग ठरतो. अयशस्वी विद्यार्थ्यांपुढे आर्थिक, सामाजिक प्रश्न उभे राहतात. वारंवार अपयशी ठरणाऱ्या विद्यार्थ्यांनी पर्यायी मार्ग निवडण्याचा सल्ला शिक्षणतज्ज्ञांनी दिला. जिल्ह्यातील एखादा, दोन विद्यार्थी रँकमध्ये आला की, परीक्षेच्या मागे लागणाऱ्यांची लाट येते. व्याख्यानातून लाल दिव्याची गोडगोड स्वप्ने दाखविणारे अधिकारी मात्र अपयश आल्यावर काय करायचे, हे सांगत नाहीत. त्यामुळे यशाचा पाठलाग करता करता आयुष्यातील महत्त्वाची वर्षे कधी निघून जातात हेदेखील कळत नाही.
स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थी संख्या किती?
राज्यभरातून ८ ते १० लाख विद्यार्थी एमपीएससीच्या विविध परीक्षा देतात. अधिकारी पदाची नोकरी प्रतिष्ठा आणि स्थैर्य देते, त्यामुळे जिल्हाभरातून वर्षाकाठी साधारणत: चार ते पाच हजार विद्यार्थी भवितव्य आजमावतात. त्यातून उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या जेमतेम १० ते १५ आहे. जिल्ह्यातील मुले सर्रास नागपूर, औरंगाबाद व पुण्याला जाऊन तयारी करतात.
परीक्षेची तयारी, वर्षाचा खर्च ७० हजारावर !
जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी दुसऱ्या शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करतात.
जेवण, खोली भाडे, अभ्यासिका, शिकवणी वर्ग, पुस्तके आदींसाठी वर्षाला ७० हजार ते लाख-दीड लाख खर्ची पडतात.
२ टक्के यशस्वी होतात, ९८ टक्क्यांचे काय?
परीक्षा देणाऱ्यांपैकी अवघे दोन-चार टक्केच यशस्वी होतात, इतरांचे काय होते? हा अभ्यासाचा विषय आहे. विहित वयोमर्यादेतही यश न मिळाल्यास, त्यानंतर मिळेल ती छोटी-मोठी नोकरी पत्करून इतरांना आयुष्य काढावे लागते.