लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : उद्धवजी, तुमचे सरकार तुम्हाला लखलाभ असो. पण, एक दिवस बाळासाहेबांना उत्तर द्यावे लागेल. मुंबईच्या चिंधड्या, चिंधड्या करवणारा मंत्रिमंडळात होता तेव्हा तुम्ही काय केले, या त्यांच्या प्रश्नाला काय उत्तर द्याल? आम्ही तर सांगू की, बाळासाहेब आम्ही संघर्ष केला. पण, आपलेच सुपुत्र मुख्यमंत्री होते. सत्तेसाठी आंधळे झाले होते. ते त्यांचा राजीनामा घेऊ शकले नाहीत, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला.
नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपने बुधवारी विधान भवनावर मोर्चा काढला. तत्पूर्वी आझाद मैदान येथे झालेल्या सभेत फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा यांच्यासह खासदार, आमदार, उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, उद्धवजी, तुमचे आमचे जमत नसेल सोडून द्या. पण, मुंबईच्या खुन्यांशी व्यवहार करणाऱ्यांना मंत्रिमंडळात ठेवले, हा देशद्रोह्याच्या विरोधातील संघर्ष आहे. जोपर्यंत बॉम्बस्फोटाचे आरोपी असलेल्यांसोबत व्यवहार करून जेलमध्ये गेलेल्या मलिकांचा राजीनामा घेत नाहीत, तोपर्यंत संघर्ष करू. अनिल देशमुख, संजय राठोड यांचा राजीनामा घेता तर दाऊदच्या माणसाचा राजीनामा का नाही? हे सरकार दाऊदच्या इशाऱ्यावर चालते का? कोणता संदेश तुम्हाला द्यायचा आहे? अशा प्रश्नांची सरबत्ती फडणवीस यांनी केली. दरम्यान, पवार यांच्या वक्तव्यावर ते म्हणाले की, खोलात जाऊनच या रेकॉर्डिंगप्रकरणी चौकशी झाली पाहिजे. म्हणूनच सीबीआय चौकशी करा, अशी मागणी आहे.
आधी सभा, मग मोर्चाआझाद मैदान येथील सभेनंतर भाजपचा मोर्चा मेट्रो सिनेमामार्गे विधानभवनाच्या दिशेने निघाला. मात्र, पोलिसांनी त्याला परवानगी नाकारत मेट्रो सिनेमाजवळ फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांना ताब्यात घेत यलो गेट पोलीस ठाण्यात नेले. काहीवेळाने सर्व नेत्यांना सोडण्यात आले.