मंत्रीमहोदय परीक्षार्थी बनतात तेव्हा..!
By admin | Published: May 12, 2015 12:56 AM2015-05-12T00:56:46+5:302015-05-12T00:56:46+5:30
राजकारणाच्या आखाड्यात सातत्याने परीक्षेला सामोरे जात असताना नेतेमंडळींना टोलवाटोलवीची उत्तरे दिली तरी चालून जात असते
नागपूर : राजकारणाच्या आखाड्यात सातत्याने परीक्षेला सामोरे जात असताना नेतेमंडळींना टोलवाटोलवीची उत्तरे दिली तरी चालून जात असते. परंतु प्रत्यक्षात सखोल अभ्यास करून उत्तरपत्रिका सोडविणे हे कठीणच. कामाच्या व्यापातून वेळ काढत सामाजिक व न्यायमंत्री राजकुमार बडोले हे काही काळासाठी चक्क परीक्षार्थी बनल्याचे दिसून आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर विचारधारा अभ्यासक्रमाच्या परीक्षेला सोमवारपासून सुरुवात झाली. ही परीक्षा देण्यासाठी ते परीक्षा केंद्रावर आले होते. चक्क मंत्री आपल्यासोबत परीक्षा देत असल्याचे पाहून इतर विद्यार्थी काही वेळासाठी भांबावले.
बडोले यांची अनेक दिवसांपासून या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्याची इच्छा होती. व्यस्त दिनक्रमामुळे या अभ्यासक्रमाला नियमित विद्यार्थी म्हणून प्रवेश घेणे त्यांना शक्य नसल्याने बहि:शाल विद्यार्थी म्हणून परीक्षा देण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारी सकाळी ९.३० वाजता ‘सोशल थॉट’ या विषयाचा पेपर असल्याने बडोले विद्यापीठाच्या ‘कॅम्पस’ येथील मराठी विभाग येथील परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वीच पोहोचले होते. आश्चर्याची बाब म्हणजे बडोले हे केवळ त्यांचे स्वीय सहायक, एक सुरक्षारक्षक व वाहनचालक यांना घेऊन साध्या गाडीनेच आले होते.
बडोले पूर्ण तीन तास पेपर सोडवत होते व सर्वसामान्य विद्यार्थ्याप्रमाणेच पेपर सोडविल्यानंतर ते बाहेर पडले.
शिक्षण ही एक निरंतर प्रक्रिया आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालत असताना नेहमी विद्यार्थी राहण्याचा प्रयत्न असतो. त्यातूनच ही परीक्षा देत आहे, असे बडोले म्हणाले.
पहिला पेपर चांगला गेला तरी आता परवाच्या पेपरची तयारी करायची आहे, असे सांगून ते तातडीने परीक्षा केंद्राहून निघूनदेखील गेले. (प्रतिनिधी)