धरणातले पाणी संपल्यावर पालिकेस आली जाग
By admin | Published: June 4, 2014 09:03 PM2014-06-04T21:03:00+5:302014-06-04T22:30:44+5:30
खडकवासला प्रकल्पात जुलै अखेर पर्यंतचा पाणीसाठा उरला असताना, आता महापालिकेने या पाण्याचे 31 ऑगस्ट पर्यंत करण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली आहे
पुणे : शहराला पाणी पुरवठा करणा-या खडकवासला प्रकल्पात जुलै अखेर पर्यंतचा पाणीसाठा उरला असताना, आता महापालिकेने या पाण्याचे 31 ऑगस्ट पर्यंत करण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली आहे. त्यामुळे पुणेकरांवर ऐन पावसाळयात पाणी संकट ओढावणार आहे. शहरास दररोज लागणारे पाणी पाहता या प्रकल्पात सुमारे साडेचार टीएमसी पाणी आवश्यक असताना, प्रत्यक्षात धरणात मात्र तीनच टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन झाल्यास पाणी कपात अटळ बनली आहे.
शहराला पाणी पुरवठा करणा-या खडकलवासला प्रकल्पातील धरणांमधून महापालिकेस दरमहा दिड टीएमसी पाणी दिले जाते. त्यानुसार, संपूर्ण वर्षभरात पालिकेस 14 ते 15 टीएमसी पाण्याचा पुरवठा केला जातो. मागील वर्षी या प्रकल्पातील खडकवासला, टेमघर, पानशेत आणि वरसगाव या धरणात सुमारे 100 टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे गेली दिड वर्षापासून सुरू असलेली पाणी कपात मागे घेण्यात आली. मात्र, त्यानंतर गेल्या तीन महिन्यात या प्रकल्पातून तब्बल 10 टीएमसी पाणी शेती आणि शहरासाठी सोडण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकल्पातील पाण्याची पातळी आणखीनच खालावली असून पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज अखेर या प्रकल्पात केवळ 2. 91 टीएमसी पाणी आहे. हे सर्व पाणी महापालिकेच्या पाणी पुरवठयासाठी 15 जुलै पर्यंत राखीव ठेवण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, गेले दोन महिने शेतीसाठी कालव्याद्वारे मोठया प्रमाणात पाणी सोडले जात आहे. तसेच कालवाही 1473 क्युसेक्सने सुरूच आहे.
या वर्षी कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच गेल्या काही वर्षांची आकडेवारी पाहता धरणे भरण्यास ऑगस्टचा शेवटचा आठवडा उजाडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या वर्षी पाटबंधारे विभागाने 31 ऑगस्ट पर्यंत पाणीसाठा राखीव ठेवण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली आहे. मात्र, त्यास आम्ही पाणी देऊ असे मोघम उत्तर या विभागाकडून देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. शहरास दरमहा लागणा-या दिड टीएमसी पाण्याची मागणी पाहता महापालिकेच्या मागणीनुसार, 31 ऑगस्ट पर्यंत पाणीसाठयाचे नियोजन करावयाचे असल्यास धरणात साडेचार टीएमसी पाणी असणे आवश्यक आहे. मात्र, प्रत्यक्षात पाऊने तीन टीएमसीच पणी आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन करावयाचे झाल्यास जादा पाणी नसल्याने आहे तेच पाणी कपातीद्वारे वाचवावे लागणार आहे.