ते दोघे कोण, ज्यांनी सेफ लॉकरमधून कागदपत्रे गहाळ केली; राष्ट्रवादीच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 04:11 PM2024-01-23T16:11:11+5:302024-01-23T16:13:36+5:30
Ajit pawar vs Sharad pawar Hearing: आज राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांची आज साक्ष नोंदविण्यात आली. यावेळी उलटतपासणीत आव्हाडांना अजित पवार गटाच्या वकिलांनी प्रश्न विचारले.
आमदार अपात्रतेवरून विधानसभा अध्यक्षांकडे राष्ट्रवादीची सुनावणी सुरु झाली आहे. आज पहिल्याच दिवशी शरद पवार गटाने मोठा दावा केला आहे. पक्षांतर्गत निवडणुका झालेले पुरावे असलेली कागदपत्रे सुरक्षित कपाटातून गायब झाल्याचा दावा शरद पवार गटाने केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा याच्या निकालावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
आज राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांची आज साक्ष नोंदविण्यात आली. यावेळी उलटतपासणीत आव्हाडांना अजित पवार गटाच्या वकिलांनी प्रश्न विचारले. यामध्ये आव्हाड यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. पक्षांतर्गत निवडणुका झाल्या होत्या असे उत्तर आव्हाड यांनी दिले. परंतु त्याचे पुरावे असलेली कागदपत्रे कपाटातून गायब करण्यात आल्याचे ते म्हणाले. शिवाय दोन व्यक्तींवर त्याची जबाबदारी होती त्या व्यक्तीच पक्ष सोडून गेल्याचेही आव्हाड यांनी सांगितले.
जबाबदारी देण्यात आलेल्या दोन माणसांनी ते गहाळ केले आहेत. संबंधित माणसे पक्ष सोडून गेले आहेत. त्यांनी या कागदपत्रांचे म्हणजे पुराव्यांचे काय केले माहिती नाही, असे आव्हाड म्हणाले.
शरद पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडून आले होते का? त्यावेळी तुम्ही उपस्थित होतात का? असा सवाल आव्हाडांना करण्यात आला. यावर शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली त्यावेळी मी स्वतः उपस्थित होतो. यावेळी अनेकांनी भाषणे केली. सगळे वरिष्ठ नेते उपस्थित होते, असे आव्हाड म्हणाले.