मुंबई – राज्यात येत्या १ मे पासून १८ वर्षावरील वयोगटातील सर्वांना मोफत लसीकरण केलं जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. सरकारने मोफत लसीकरणाचा निर्णय घेतल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचे आभारी आहोत. त्याचसोबत ज्यांना शक्य आहे त्यांनी मुख्यमंत्री मदत निधीत लसीची रक्कम दान करा असं आवाहन महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी युवकांना केले आहे.
याबाबत सत्यजित तांबे म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व तरुणांच्या वतीने मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व संपूर्ण महाविकास आघाडी मंत्रिमंडळाचे आभार मानतो. तसेच मी पैसे देण्यास सक्षम असलेल्या सर्वांना आवाहन करतो की, कृपया मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये लसीची रक्कम दान करा. ही रक्कम कोविड 19 संबंधित इतर कामांसाठी वापरली जाऊ शकते जसे की औषधे खरेदी करणे, ऑक्सिजन प्लांट्सची उभारणी करणे यासाठी मार्गी लागेल असं आवाहन त्यांनी केले आहे.
कारण संकटाच्या काळात जनतेला वाऱ्यावर सोडणं ही काँग्रेसची संस्कृती नाही!
खरंतर कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती असल्याने प्रत्येक नागरिकाचे मोफत लसीकरण करण्याची जबाबदारी मोदी सरकारची होती. मात्र इथे देखील त्यांनी जबाबदारीपासून पळ काढला. परंतु त्यांनी हात झटकले म्हणून आम्हीही हात झटकणार नाही असं काँग्रेसनं म्हटलं आहे त्याचसोबत केंद्रापासून राज्यापर्यंत मोफत लसीकरणासाठी काँग्रेस नेत्यांनी पाठपुरावा केला त्याला यश आलं. कोरोनाचा प्रसार रोखायचा असेल तर व्यापक लसीकरणाशिवाय पर्याय नाही ही भूमिका काँग्रेसने मांडली आणि त्यासाठी पाठपुरावा देखील केला. या पाठपुराव्याचे यश म्हणूनच आज सर्वांच्या मोफत लसीकरणाचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला असून प्रत्येक नागरिकाला मोफत लस मिळणार आहे. स्वातंत्र्यानंतर कुठलाही भेद न करता सर्वांचे मोफत लसीकरण करत काँग्रेसने लोकांचे जीव वाचवले. आणि आताही निर्बंध लागू करण्याआधी, लसीचे दर ठरण्याआधीच काँग्रेसने मोफत लसीकरणाची मागणी केली होती असंही काँग्रेसनं म्हटलं आहे.
कोविन एपवर नोंदणी करा
१८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांनी कोविन मोबाईल एपवर नोंदणी करावी, कुठेही लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये लसीकरणाबाबत व्यवस्थित व सुस्पष्ट सूचना मिळतील असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण कार्यक्रमाचे नियोजन करताना कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी घेण्याची मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सूचना केली आहे.