मुंबई - सध्या राज्याच्या राजकारणात पक्षांतराचे मोठे वारे वाहताना दिसत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीमधील अनेक नेते सत्ताधारी भाजपा-शिवसेनेत प्रवेश करत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या इतक्या मोठ्या प्रमाणात पक्षांतरामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठी गळती लागली आहे. मात्र एका रात्रीत पक्ष बदलणाऱ्या नेत्यांनाही याचा फटका बसताना पाहायला मिळतोय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार असलेले उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपाचा झेंडा हाती घेतला. नेहमी आपल्या बेधडक शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या उदयनराजेंनी अवघ्या काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावरुन लोकसभा निवडणूक लढविली होती. यात उदयनराजे जिंकलेही पण तीन महिन्यात त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. मात्र उदयनराजेंनी निवडणुकीत केलेल्या भाषणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतायेत.
या व्हिडीओ उदयनराजे नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना ‘माझे अनेक मित्र भाजपामध्ये आहेत. भाजपाचे अनेक आमदार आणि खासदार त्यांच्यावर बोलायला घाबरतात. अरे मोदी हैं तो क्या? आमच्या इथं साताऱ्याला मोदी पेढेवाले आहेत असा टोला त्यांनी नरेंद्र मोदींना लगावला होता तर ‘हा मोदी एवढा मोठा कोण लागून गेला?’ असा सवाल उदयनराजेंनी करत एका माणसाला जाग येते आणि सगळ्यांची झोप उडवतो अशा शब्दात नोटाबंदीवर प्रतिक्रिया दिली होती.
तर दुसरीकडे नुकतेच स्वगृही परतलेले राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांचाही व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मात्र ज्यावेळी भास्कर जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते त्यावेळी त्यांनी ठाकरे कुटुंबीयांच्या संपत्तीवर प्रश्न निर्माण केले होते. उद्धव ठाकरे यांच्याकडे ना कोणता साखर कारखाना आहे ना कोणती शिक्षण संस्था, ते फोटोग्राफी करतात पण त्यांचा स्टुडिओ कुठे आहे? मग त्यांच्या उत्पन्नाचं सोर्स काय असा सवाल भास्कर जाधव यांनी केला होता. त्यामुळे ठाकरेंकडे इतकी संपत्ती आली कुठून याचा खुलासा करावा अशी मागणी त्यांनी केली होती. हा व्हिडीओही सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यामुळे पक्षांतर करणाऱ्या नेत्यांसाठी सोशल मीडिया अडचणीचा ठरतोय असंच चित्र निर्माण होत आहे.