देशात सहा तर महाराष्ट्रात दीड लाख कंपन्या बंद पडण्यास कोण जबाबदार ?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 06:54 PM2019-10-05T18:54:56+5:302019-10-05T18:59:45+5:30
काँग्रेसला भाजपप्रमाणे मार्केटिंगची गरज..
पुणे : देशातील बेकारी हटवून रोजगाराची स्वप्ने दाखवणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी सध्याच्या आर्थिक मंदीबद्द्ल उत्तरे द्यावीत. अनेक उद्योगधंदे बंद पडत आहेत. लाखोजण बेरोजगार झाले आहेत. अशावेळी अर्थमंत्री ओला आणि उबेरमुळे मंदी आल्याचे सांगतात. देशात सहा लाख तर महाराष् ट्रात दीड लाख कंपन्या बंद पडल्या आहेत. तसेच राज्यातील 950 कारखान्यांना टाळे लागले आहेत. विविध उत्पादनाच्या शंभर शोरुम बंद पडले आहेत. यासगळ्या परिस्थितीला कोण जबाबदार आहेत. असा सवाल आमदार अनंत गाडगीळ यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला.
शनिवारी गाडगीळ यांनी पत्रकार परिषदेत सत्ताधारी भाजपवर टीका केली. ते म्हणाले, पुण्यातील हिंजवडी खराडीतील आयटी कंपन्या करत तीन हजार कोटींचे उत्पन्न सॉफ्टवेअरव्दारे देते. आता त्याची आकडेवारी अठराशे कोटीवर आली आहे. याप्रकारच्या मंदीमुळे मोदींच्या गुजरात मध्ये हातमाग, डायमंड आदी क्षेत्रातील दीड लाख लोकांनी सुरतबाहेर स्थलांतर केले आहे. मोदी सरकार हे केवळ इव्हेंट मँनेजमेंट कंपनी झाली आहे. या सरकारने न्यायव्यवस्थेवर प्रचंड दबाव आणला आहे. न्यायव्यवस्थेची परिस्थिती सांगायची झाल्यास आताच्या घडीला देशात 1हजार 79 न्यायधीशांची गरज असताना त्यापैकी केवळ 601 जणांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत. जिल्हास्तरीय न्यायालयांमध्ये पावणेतीन कोटी केसेस, उच्च न्यायालयात 40 लाख तर सर्वोच्च न्यायालयात 60 हजार केसेस प्रलंबित आहेत. यासगळयावर कुणीच बोलण्यास तयार नाही.
विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले, भाजपला सडेतोड उत्तर देताना कॉग्रेसला त्यांच्याप्रमाणे माकेर्टींगची गरज आहे. तसेच आघाडीने निवडणूकांमधून ढिसाळ अर्थव्यवस्थेचा प्रश्न मांडावा, शासनाची निष्क्रीयता सर्वसामान्य मतदारांना समजावून सांगावी. स्मार्ट सिटीची स्वप्ने दाखवणा-या सरकारने काय केले? हे आता सांगण्याची वेळ आली आहे. प्रचारात या मुद्यांवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज असल्याचे गाडगीळ म्हणाले.
* तिकीट वाटपाच्या वेळी कुठे विचारात घेतले...
विधानसभा निवडणूकांच्या दरम्यान सर्वत्र तिकीट वाटपाची चर्चा सुरु असताना काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठांना त्यापासून लांब ठेवण्यात आले. यात माझाही समावेश होता. मलाही पक्षात काय चालले आहे? कुणाला तिकीट देण्यात आले आहे? याविषयी काहीही माहिती नव्हती. जे काही आहे ते सर्व अगोदर ठरलेले होते. उमेदवार निवडीबाबत एका ठिकाणी बैठक झाली. त्यात उमेदवाराच्या नावावर शिक्का मारण्यात आला. ज्येष्ठांना विचारत घेतले जात नसल्याची खंत गाडगीळ यांनी यावेळी व्यक्त केली.
.................