कोळशाचा स्टॉक का केला नाही? शरद पवार यांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 03:22 AM2017-10-09T03:22:57+5:302017-10-09T03:23:26+5:30
कोळसा टंचाईमुळे भारनियमन करावे लागत असल्याचे सरकार सांगत आहे. पण मी २२ आॅगस्ट रोजीच केंद्र सरकारला पत्र पाठवून पावसापूर्वीच कोळशाचा स्टॉक करण्यास सांगितले होते.
मुंबई : कोळसा टंचाईमुळे भारनियमन करावे लागत असल्याचे सरकार सांगत आहे. पण मी २२ आॅगस्ट रोजीच केंद्र सरकारला पत्र पाठवून पावसापूर्वीच कोळशाचा स्टॉक करण्यास सांगितले होते. पण सरकारने त्यावर काहीच निर्णय घेतला नाही, असे सांगत नियोजनाअभावीच राज्यात आठ-आठ तासांचे भारनियमन सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.
राष्ट्रवादीच्या लीगल सेलने आयोजित केलेल्या अधिवक्ता परिषदेत पवार बोलत होते. ते म्हणाले, भाजपाच्या काळात शेतकरी आत्महत्यांचा ग्राफ वाढत आहे. सरकार कर्जमाफीसाठी आॅनलाइन पद्धतीने २० कॉलमचा फॉर्म भरण्याची सक्ती करत आहे. एखाद्या लहानशा चुकीमुळेसुद्धा शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचे पवार म्हणाले.
कुठे आहे दिवाळी?
पंतप्रधान म्हणतात, १५ दिवस आधीच दिवाळी आली. पण ती कुठेच कशी दिसत नाही, असा सवाल करून खा. पवार म्हणाले, जीएसटीसाठी काँग्रेसच्या काळात पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सांगून मी सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक घेण्यास सांगितले होते. त्या वेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र्र मोदी यांनी जीएसटीच्या विरोधात सर्वांत जास्त आक्रमक भाषण केले होते. आज त्यांनीच जीएसटीचा कर २८ टक्क्यांवर नेला, अशी टीका पवार यांनी केली.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी : आज तरुणांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्यक्त होणाºयांचे मूलभूत अधिकार नोटिसा पाठवून दाबले जात आहेत. लोकांच्या मूलभूत अधिकारांच्या रक्षणासाठी वकिलांनी पुढे यावे, असेही पवार म्हणाले.