अतिरिक्त आयुक्त वाकडे यांना बदलीनंतरही ‘रिलिव्ह’ का नाही?
By Admin | Published: August 22, 2016 12:41 AM2016-08-22T00:41:54+5:302016-08-22T00:41:54+5:30
आयुक्त सी. एच. वाकडे यांची महानिरीक्षक पदोन्नतीवर बदली होऊन तीन आठवडे उलटत आले तरी त्यांना अद्याप ‘रिलिव्ह’ करण्यात आलेले नाही
पुणे : गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सी. एच. वाकडे यांची महानिरीक्षक पदोन्नतीवर बदली होऊन तीन आठवडे उलटत आले तरी त्यांना अद्याप ‘रिलिव्ह’ करण्यात आलेले नाही. वाकडे यांच्यासाठी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला आग्रही असून त्यांना पुण्यातच ठेवण्यासाठी गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्तपद महानिरीक्षक दर्जाचे करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पोलीस आयुक्तालयामार्फत तसा प्रस्तावही शासनाला सादर करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे वाकडे बदलीच्या ठिकाणी का जात नाहीत, तसेच आयुक्तही त्यांना का सोडत नाहीत याची उलटसुलट चर्चा पोलीस दलासह पुणेकरांमध्ये रंगली आहे.
शासनाच्या गृह विभागाने २८ जुलै रोजी सी. एच. वाकडे आणि चंद्रशेखर दैठणकर यांना महानिरीक्षकपदी पदोन्नती दिली. यापूर्वी पुण्यात काम केलेल्या दैठणकरांना नागपूरहून पुन्हा पदोन्नतीवर पुण्यातीलच राज्य गुप्तवार्ता प्रबोधिनीच्या संचालकपदी नेमण्यात आले. तर वाकडे यांना तुरुंग प्रशासनाच्या मुख्यालय महानिरीक्षकपदी नेमण्यात आले. सध्या पुण्यामध्ये अतिरिक्त आयुक्तपदाच्या चार जागा आहेत. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या दक्षिण आणि उत्तर विभागाचे दोन तर प्रशासन आणि गुन्हे शाखेचे प्रत्येकी एक अशी चार पदे आहेत. यातील उत्तर आणि दक्षिणची पदे बराच काळ रिक्त होती. त्याचा अतिरिक्त कार्यभारही वाकडे यांच्याकडेच होता. काही महिन्यांपूर्वीच शशिकांत शिंदे यांची उत्तर विभागाच्या अतिरिक्त आयुक्तपदी नेमणूक झाली. गुन्हे शाखेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त डॉ. शहाजी सोळुंके यांची पदोन्नतीने कारागृह विभागात जून २०१५मध्ये बदली झाली होती.
मुंबईच्या पीसीआरमधून वाकडे यांनी पुण्याला अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाली. वाकडे यांनी नागपूरला काम केले असल्यामुळे तो अनुभव पुण्याला येण्यामध्ये उपयोगी आल्याची चर्चा त्या वेळी रंगली होती. वाकडे यांनी यापूर्वी पुण्यात काम केलेले आहेच.
यासोबतच तेलगी प्रकरणाचा तपासही त्यांनी केला आहे. पुण्यामध्ये येऊन एक वर्ष झालेल्या वाकडेंना पदोन्नती मिळाल्यावर त्यांना नेमणुकीच्या ठिकाणी जाण्यासाठी सोडणे आवश्यक होते. मात्र, त्यांना अद्याप सोडण्यात आलेले नाही. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे त्यांनी प्रत्यक्ष भेटून सोडण्याविषयी विनंती केली होती. मात्र, आयुक्तांनी त्याला नकार देत हे पदच उन्नत करून घेण्याविषयी चर्चा केली होती.
गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्तपद महानिरीक्षक दर्जाचे झाल्यास शहरामध्ये दोन महानिरीक्षक होतील. सध्या कायदा-सुव्यवस्थेची प्रमुख जबाबदारी असलेल्या सह आयुक्त सुनील रामानंद यांच्या बदलीचीही मध्यंतरी बरीच चर्चा झाली होती. त्यांची बदली झाल्यावर वाकडे सह आयुक्त होतील
अशीही अटकळ बांधण्यात येत
होती.
शहर पोलीस दलाला शिस्तीचा बडगा उगारून ‘सुतासारखे सरळ’ आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या रामानंद यांचा बहुसंख्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धसका घेतलेला आहे. त्यातच पोलीस आयुक्तपदी रुजू झाल्यानंतर शुक्ला यांनीही शिस्तीचा बडगा उगारला. मात्र, पोलीस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या मुदतपूर्व बदल्यांच्या प्रकरणात मॅट कोर्टामध्ये नामुष्की ओढवलेल्या अतिवरिष्ठांना आपल्या आदेशापासून माघार घ्यावी लागली.
>कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याचे कारण ?
सध्या शहर पोलीस दलामध्ये सह आयुक्त सुनील रामानंद यांचे खात्यांतर्गत माहितीचे जाळे मजबूत आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यापासून आयुक्तालयापर्यंतच्या बारीकसारीक घटनांची त्यांना माहिती मिळते. अशातच पोलीस आयुक्तांना मात्र आपल्या हक्काचे अधिकारी हवे आहेत. आगामी काळात गणेशोत्सव, नवरात्र, महापालिका निवडणुका येऊ घातल्या आहेत. सध्याची शहरातील पोलीस अधिकाऱ्यांची मानसिकता पाहता कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे वाकडेंना सोडण्यात येत नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, हे तितकेसे तर्कसुसंगत नाही. ‘खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी’ या म्हणीचा प्रत्यय सध्या पोलीस आयुक्तालयामध्ये येत आहे. पोलीस दलामध्ये पुणे शहर हे स्वतंत्र ‘केडर’ मानले जाते. त्यामुळेच की काय परंतु काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना पुण्याचा मोह सुटत नसल्याचे चित्र आहे.