... म्हणून नरकचतुर्दशीला पायाखाली कारिटं फोडतात!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2017 11:18 AM2017-10-18T11:18:58+5:302017-10-18T11:27:02+5:30
काही ठिकाणी अंघोळीआधी तर काही ठिकाणी अंघोळीनंतर पायानं कारिटं ठेचलं जातं. त्यालाही एक कारण आहे.
श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला म्हणून आपण आश्विन महिन्याच्या चौदाव्या दिवशी नरकचतुर्दशी साजरी करतो. यादिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नान करण्याची पद्धत आहे. असं म्हणतात की पहाटे आकाशात तारे दिसतात तोवर अंघोळ करणे गरजेचं असतं. याचदिवशी आपण अंघोळीनंतर पायाच्या अंगठ्याने कारीटं (हिरव्या रंगांचं कडू फळ) फोडतो. पण तुम्हाला माहितेय का आपण असे का करतो.
नरकासुर नावाच्या एका असूर राजाची भगवान श्रीकृष्णाच्या काळात मोठी दहशत होती. तो इतरांना फार त्रास देत असे. स्त्रियांशी वाईट वागत असे. त्यामुळे जनता त्याला फार त्रासली होती. ही गोष्ट जेव्हा श्रीकृष्णाला कळली तेव्हा त्याने सत्यभामेसह त्या असूरी राजावर आक्रमण केलं आणि त्याचा वध केला. त्याच्या वधाचं प्रतिक म्हणून आपण हे कडू फळ फोडतो. आणि त्याचा रस जिभेला लावतो. याबाबत असं सांगण्यात येतं की, ‘ते फळ फोडून आपण आजच्या काळातील प्रतिकात्मक नरकासूराचा वध करतो. शिवाय दुसरी वैज्ञानिक गोष्ट अशी सांगितली जाते की, अश्विन महिन्यात म्हणजेच दिवाळीच्या काळात हिवाळा सुरू झालेला असतो. फार थंडी असतो. त्यामुळे आपल्या शरीराचे तापमान योग्य प्रमाणात ठेवण्यासाठी हे कडू फळ चाखलं जातं.'
कारीटे फोडण्याची ही प्रथा संपूर्ण महाराष्ट्रात नाही. काहीच ठिकाणी या प्रथेचं पालन केलं जातं. शिवाय काही ठिकाणी हे कारिटे अंघोळीनंतर ठेचतात. तर काही ठिकाणी अंघोळीआधी कारिटे ठेचले जातात, कारण या फळाला एक उग्र वास असतो. त्यामुळे अंघोळीआधी कारिटे ठेचून त्यानंतर अंघोळ केली जाते.
त्याचप्रमाणे या कारिटेला विविध नावेही आहेत. काही ठिकाणी या फळाला कर्टुले म्हणतात. तर काही ठिकाणी चिराटे म्हणतात. कारिटे हे अनेकवचनी असून कारीट हे एकवचनी नाव आहे. कारीटं हे कोकणात आढळणारे रानवेलीवर येणारं फळ आहे. हे फळ वेलीला लागते जे एकदम काकडीच्या वेलीसारखे दिसते. काकडीच्या फुलांसारखीच याचीही फले पिवळ्या रंगाची असतात. अगदी काकडीसारखेच हे फळ दिसत असले तरी याचा आकार अंड्यासारखा असतो. आतल्या बिया काकडीच्या बियांसारख्या असतात पण थोड्या आखूड असतात.