मुंबई : महाराष्ट्राचया राजकारणाने अभूतपूर्व वळण घेतले असून सत्तास्थापनेचा मोठा पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेला काँग्रेस पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट करतानाच अंतिम निर्णय सोनिया गांधीच घेतली हे स्पष्ट झाले आहे. तर भाजपाच्या दिवसभरातील दुसऱ्या बैठकीला अमित शहा थेट दिल्लीतून मार्गदर्शन करणार असल्याचे समजत आहे.
शिवसेना, भाजपा मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसल्याने तिढा वाढला आहे. यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उडी घेतल्याने गुंतागुंत आणखीच वाढली आहे. एकीकडे शिवसेना राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा रंगलेली असताना भाजपाला राज्यपालांनी सत्तास्थापनेचे निमंत्रण दिल्याने चुरस आणखीनच वाढली आहे. भाजपाला आणि शिवसेनेला एकमेकांशिवाय पर्याय नाही. त्यामुळे ही कोंडी फुटण्याचे नाव घेत नाहीय.
यातच भाजपाने आज दुपारी कोअर कमिटीची बैठक घेतली. यामध्ये शिवसेना सरकार स्थापन करणार असेल तर भाजपा विरोधी बाकांवर बसणार असल्याची भुमिका घेतल्याचे समजते. मात्र, तरीही भाजपा आशावादी असून शिवसेनेला तासाभराचा अल्टीमेटम देत पुन्हा 4 वाजता बैठक घेत आहे. यामध्ये पक्षाचे अध्यक्ष अमित शहा हे मार्गदर्शन करणार आहेत. यानंतर शहा काय करायचे याबाबतचा निर्णय घेणार असून हा निर्णय भाजपाचे नेते जाहीर करणार आहेत.