'वंचित'च्या निर्णयानंतरच भाजप-शिवसेना युतीचं ठरणार ?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 11:35 AM2019-08-17T11:35:34+5:302019-08-17T11:37:47+5:30
वंचित आघाडी स्वबळावर लढल्यास त्याचा फायदा भाजपलाच होणार आहे. किंबहुना भाजपला स्वबळावर लढण्यासाठी बळच मिळेल. परंतु, वंचित बहुजन आघाडीत सामील झाल्यास भाजप आणि शिवसेनेला स्वबळाची तयारी करून देखील युती करावी लागणार अशी स्थिती राज्यात आहे.
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीचय पक्षांकडून सुरू झाली आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून यात्राही काढण्यात आल्या. परंतु, राज्यातील पूरस्थितीमुळे या यात्रा स्थगित करण्यात आल्या आहेत. परंतु, अद्याप युती आणि आघाड्यांच निश्चित असं काहीही ठरलं नाही. या उलट शिवसेना आणि भाजपची स्वबळासाठी चाचपणी सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तर शिवसेनेला देखील बळ मिळाले आहे. अनेक विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेना यांना आघाडी मिळाली आहे. त्यामुळे भाजपला विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्याचा विश्वास आहे. परंतु, हा विजय शिवसेनेला सोबत घेऊन मिळवायचा की, एकट्याने यावर पक्षात संभ्रम आहे. त्यामुळे भाजपकडून युती असल्याचे सांगण्यात आले असले तरी अनेक मतदारसंघात स्वबळावर लढण्याची तयारी सुरू असल्याचे समजते.
दुसरीकडे शिवसेनेने देखील स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा त्याचाच भाग होता का, असा प्रश्न उपस्थित होतो. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना प्रवेश देण्यात आला आहे. ज्या जागेवर भाजप मजबूत नाही, तिथे प्रामुख्याने दिग्गज नेत्यांना भाजपने पक्षात घेतले आहे. जेणे करून ऐनवेळी युती तुटली तरी या नेत्यांना मैदानात उतरून बहुमताकडे जाता येईल.
दरम्यान विरोधी पक्षात देखील आघाडी संदर्भात बोलणीच सुरू आहे. त्यात लोकसभा निवडणुकीपासून उभं राहिलेलं वंचित बहुजन आघाडीच्या आव्हानामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे आघाडीकडून वंचितशी बोलणी करण्यात आली. परंतु, त्याला यश आले नाही. वंचित आघाडी स्वबळावर लढल्यास त्याचा फायदा भाजपलाच होणार आहे. किंबहुना भाजपला स्वबळावर लढण्यासाठी बळच मिळेल. परंतु, वंचित बहुजन आघाडीत सामील झाल्यास भाजप आणि शिवसेनेला स्वबळाची तयारी करून देखील युती करावी लागणार अशी स्थिती राज्यात आहे. एकूणच वंचितच्या निर्णयावरच भाजप-शिवसेना युतीच भवितव्य अवलंबून असल्याचे बोलले जात आहे.