लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात आरोग्यविषयक टास्क फोर्सच्या धर्तीवर उद्योग विश्वासाठी एक टास्क फोर्स तातडीने उभारण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी बोलाविलेल्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी फिक्की, सीआयआय तसेच इतर उद्योग प्रतिनिधींशी संवाद साधला. संकटाच्या काळात आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, अशी ग्वाही उद्योग जगताने मुख्यमंत्र्यांना दिली.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजनची नितांत गरज आहे, याशिवाय उद्योगांनी औषधे, बेड्स सुविधा वाढविणे, चाचणी केंद्रे, लसीकरणाला वेग देणे अशी या लढाईत शक्य होईल तशी सर्व मदत राज्य सरकारला करावी, असे आवाहन त्यांनी उद्योगांना केले. उद्योग टास्क फोर्सच्या माध्यमातून कोरोना काळात उद्योगांना येणाऱ्या अडचणी सोडविल्या जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.बैठकीत राज्याची निकड लक्षात घेऊन प्राधान्याने आपापल्या परीने ऑक्सिजनची उपलब्धता तातडीने करून देण्यात येत आहे, असे उद्योगांच्या प्रतिनिधींनी सांगितले. याशिवाय विलगीकरण बेड्स सुविधा वाढविणे, चाचणी केंद्रे स्थापन करणे आणि लसीकरण वाढविणे यामध्ये उद्योग पुढाकार घेऊन लगेच कार्यवाही सुरू करतील, असेही सांगण्यात आले.या बैठकीत उदय कोटक, निरंजन हिरानंदानी, दीपक मुखी, हर्ष गोयंका, सलील पारेख, नील रहेजा, संजीव बजाज, अनंत गोयंका, बाबा कल्याणी, बी. त्यागराजन, अनंत सिंघानिया, बनमाली अग्रवाल, अश्विन यार्दी, एस. एन सुब्रमनियन, सुनील माथुर, संजीव सिंग, नौशाद फोर्बस, सुलज्जा फिरोदिया, समीर सोमय्या, आशिष अग्रवाल आदी उद्योगपती सहभागी होते. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीदेखील आपल्या सूचना केल्या.
उद्योगांनी शिवभोजन थाळीसारखे उपक्रम करावेतराज्य शासन मोफत शिवभोजन थाळी देत आहे. उद्योगांनीही आपल्या परिसरात किंवा जवळच्या गावांमध्ये अशा पद्धतीने भोजन द्यावे, असे मुख्यमंत्री म्हणाले. उद्योगांनी जास्तीत-जास्त ऑक्सिजन निर्मिती करावी, असे आवाहन सरकारतर्फे बैठकीत करण्यात आले. जेएसडब्ल्यू, महिंद्र, गोदरेज, बजाज, रिलायन्स, टाटा, ब्ल्यूस्टार, एल ॲण्ड टी, इन्फोसिस, कायनेटिक इंजिनिअरिंग यांच्या प्रतिनिधींनी, विशेषत: ऑक्सिजन उपलब्धता करून देण्यात येईल तसेच त्यांच्या उद्योगांच्या परिसरात चाचणी केंद्रे उभारणे, लसीकरण मोहीम असे उपक्रम राबविण्याचेही त्यांनी मान्य केले.
मुख्य सचिव सीताराम कुंटे, उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बलदेव सिंह, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, प्रधान सचिव सौरव विजय, एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अनबलगन आदी उपस्थित होते.
कोरोना सुसंगत अशी कार्यप्रणाली तयार कराकोविडची तिसरी लाट आल्यास उद्योग- व्यवसायांचे नुकसान होऊ नये आणि अर्थचक्राला देखील झळ बसू नये, म्हणून उद्योगांनी आतापासूनच कोरोना सुसंगत कार्यपद्धतीचे नियोजन करावे. तशा सुविधा उभाराव्यात, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.