दुसऱ्या आठवड्यात तरी कामकाज चालणार का ?

By admin | Published: December 14, 2015 02:32 AM2015-12-14T02:32:04+5:302015-12-14T02:32:04+5:30

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात तरी कामकाज नियमित सुरू होणार की, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अडून बसलेले विरोधक स्वत:च्या भूमिकेवर कायम राहणार हा प्रश्न कायम आहे

Will it work in the second week? | दुसऱ्या आठवड्यात तरी कामकाज चालणार का ?

दुसऱ्या आठवड्यात तरी कामकाज चालणार का ?

Next

अतुल कुलकर्णी, नागपूर
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात तरी कामकाज नियमित सुरू होणार की, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अडून बसलेले विरोधक स्वत:च्या भूमिकेवर कायम राहणार हा प्रश्न कायम आहे. कर्जमाफीच्या भूमिकेवर कायम राहत कामकाज बंद पाडण्याचे राजकीय लाभ जास्त आहेत, असा मुद्दा समोर आल्याने सोमवारी विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीत काय निर्णय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
नुसती चर्चा नको, कर्जमाफी द्या, असे म्हणत विरोधकांनी पहिला आठवडा कामकाज रोखून धरले. दुसऱ्याही आठवड्यात हीच भूमिका कायम ठेवली तर तो इतिहास घडेल. नागपूर अधिवेशन सलग दोन आठवडे कामकाजाविना असे कधीही घडलेले नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांनी विधीमंडळाचे कामकाज रोखून धरले असा राज्यभर संदेश जाईल, असा विरोधकांचा कयास आहे. टू जी घोटाळ्यावरुन भाजपाने सलग दोन अधिवेशन लोकसभेचे कामकाज होऊ दिले नव्हते, याची आठवण विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात करून दिली होती. त्यामुळे तीच रणनिती भाजपासरकारविरुध्द वापरावी, असे काँग्रेसमध्ये अनेकांचे मत आहे. मात्र विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील कोणती भूमिका घेतात यावरही बरेच काही अवलंबून आहे. जर कामकाजात भाग घेतला तर एवढे दिवस कामकाज का रोखले म्हणून माध्यमे झोडून काढतील. विरोधकांना शरद पवार यांचा वाढदिवस, शेतकऱ्यांसाठीचा काँग्रेसचा मोर्चा या गोष्टी जास्त महत्वाच्या होत्या अशी टीका होईल. शिवाय दुष्काळ, कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या यावरील विरोधकांच्या भाषणापेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाला जास्त प्राधान्य मिळेल. आघाडी सरकारच्या काळातल्या चुकीच्या नियोजनामुळे हे सगळे घडत आहे, असा हल्ला मुख्यमंत्र्यांनी चढवला तर तोही सहन करावा लागेल. त्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी, त्यांना कर्जमाफी मिळावी म्हणून मुख्यमंत्र्यांना त्यांच्याच नागपुरातले अधिवेशन आम्ही होऊ दिले नाही असे राज्यभर सांगता येईल, असे विरोधकाचे राजकीय गणित आहे.
मात्र दुसऱ्या आठवड्यात सत्ताधाऱ्यांना काही करून कामकाज चालू ठेवायचे आहे. विरोधकांना कामकाज बंद पाडण्याचे व शेतकऱ्यांच्या मनात त्यांच्या विषयी सहानुभूती निर्माण होऊ न देण्यासाठी शनिवार, रविवार मोर्चेबांधणी सुरु होती. सोमवारी सकाळी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक आहे. त्यात अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याची रणनिती ठरले असे विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Will it work in the second week?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.