एमयूटीपी-३च्या प्रकल्पांना निधी मिळणार?
By admin | Published: May 17, 2016 05:42 AM2016-05-17T05:42:01+5:302016-05-17T05:42:01+5:30
एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) उपनगरीय लोकल प्रवाशांसाठी एमयूटीपी अंतर्गत अनेक रेल्वे प्रकल्प राबविले जात आहेत.
मुंबई : एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) उपनगरीय लोकल प्रवाशांसाठी एमयूटीपी अंतर्गत अनेक रेल्वे प्रकल्प राबविले जात आहेत. सध्या एमयूटीपी-३मधील तीन प्रकल्प सुरू करण्यावर एमआरव्हीसीकडून भर देण्यात आला आहे. त्यासाठी निधीची गरज भासणार असून, वर्ल्ड बँकेशी बोलणी सुरू केली असल्याची माहिती एमआरव्हीसीकडून देण्यात आली. वर्ल्ड बँकेनेही निधी देण्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगण्यात आले.
एमयूटीपी-१ प्रकल्प एमआरव्हीसीकडून पूर्ण करण्यात आल्यानंतर एमयूटीपी-२मधील काही प्रकल्प मार्गी लावले जात आहेत. हे प्रकल्प डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. एमयूटीपी-२मधील प्रकल्प पूर्ण करताच एमयूटीपी-३मधील प्रकल्पांना त्वरित सुरुवात करण्यात येईल. या प्रकल्पांचा खर्च हा जवळपास १0 हजार कोटी रुपये असून, त्याला वर्ल्ड बँक किती निधी देणार हे स्पष्ट झालेले नाही. त्यासाठीच एमआरव्हीसीकडून वर्ल्ड बँकेच्या सदस्यांसोबत बैठक घेण्यात आली होती. वर्ल्ड बँकेकडून एमयूटीपी-३मधील प्रकल्पांच्या खर्चाची माहिती घेण्यात आली. ही माहिती घेतल्यानंतर खर्चाचा अंतिम अहवाल तयार केला जाईल आणि त्यानंतरच निर्णय घेण्यात येईल, असे एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्याकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र निधी देण्याबाबत वर्ल्ड बँक सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले. एमयूटीपी-३मध्ये विरार-डहाणू चौपदरीकरण, पनवेल-कर्जत मार्गाचे दुहेरीकरण आदी प्रकल्पांचा समावेश आहे.