ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10- मुंबई महापालिकेवर स्वबळावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेनेने सध्या प्रचारात पूर्ण जोर लावला आहे. काहीही करुन महापालिकेत शिवसेनेचा महापौर बसवायचाच आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढायचे या निर्धाराने शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी भाजपा विरोधात आघाडी उघडली आहे. विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष एकमेकांशी युती न करता स्वतंत्र लढले होते आणि राज्यात पहिल्यांदाच भाजपाला शिवसेनेपेक्षा दुप्पट जागा मिळाल्या.
दोन्ही पक्षांमधील मतभेद इतके टोकाला पोहोचले आहेत की, शिवसेनेने सरकार नोटीस पिरेडवर असून सत्तेतून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. येत्या 18 फेबुवारीला शिवजयंतीच्या पुर्वसंध्येला बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये होणा-या सभेमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मोठी घोषण करतील अशी चर्चा सुरु आहे.
राज्य सरकारमधील शिवसेनेचे मंत्री सुध्दा सध्या खिशात राजीनामे घेऊन फिरत आहेत. या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खरोखर सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेईल का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपाच्या सत्तेत शिवसेनेचे मन रमत नाही पण, महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करायची नाही म्हणून आपण सत्तेत आहोत असा युक्तीवाद शिवसेनेकडून केला जातो.
आता फक्त भाजपावर दबाव आणण्यासाठी शिवसेनेकडून अशी खेळी केली जात आहे की, शिवसेना खरोखर बाहेर पडणार याचे उत्तर पुढच्या आठ दिवसात मिळेलच. महापालिका जिंकण्यासाठी शिवसेनेने असा निर्णय घेतलाच तर, मुंबई महापालिकेसाठी शिवसेनेने महाराष्ट्र अस्थिर केल्याचा ठपका त्यांच्यावर बसू शकतो आणि इतके करुनही स्वबळावर महापालिकेची सत्ता नाही मिळाली तर, तेलही गेले तूपही गेले अशी शिवसेनेची अवस्था होईल.