मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे चांगले सहकारी असल्याचे सांगत आता मानवी बॉम्बमधील वाती विझून नाती निर्माण झाल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. याचबरोबर शिवसेनेने लिहून दिल्याचेही त्यांनी मान्य करत अशोक चव्हाण खरे बोलल्याचे म्हटले आहे. घटनेला धरून राज्य चालवण्याचं बंधन सगळ्या सरकारवरती असतं. पण अशोक चव्हाणसुद्धा मंत्रिमंडळात मला चांगलंच सहकार्य करताहेत, असे स्पष्टीकरण दिले.
सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. यातील तिसरा आणि शेवटचा भाग आज प्रकाशित झाला. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी सीएए, एनआरसी, भाजपासोबत पुन्हा जाण्याची शक्यता यावर मत मांडले आहे. ठाकरे यांनी एनआरसी हा धोकादायक कायदा असल्याचे म्हटले आहे. यामध्ये मुसलमानच नाहीत तर 40 टक्के हिंदूही भरडले जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
यावेळी संजय राऊतांनी आता मनानं बीजेपीबरोबर नाही आहात किंवा पूर्णपणे तुटलेले आहात. आपण आपली दिशाच वेगळी करून घेतली आहे का? असा प्रश्न विचारला. यावेळी ठाकरे यांनी भाजपावर जोरदार टीका केली. हा काही खेळ नव्हता. 25-30 वर्षे शिवसेना भाजपासोबत होती. ती केवळ एक राजकारणातली अपरिहार्यता म्हणून नाही. या पक्षात प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, अटलबिहारी वाजपेयी, अडवाणी, नितीन गडकरी होते. त्यांच्यासोबत पारिवारिक नाती आणि ऋणानुबंध निर्माण झाले होते. ते तुटताना यातना झाल्या आहेत, असे सांगत भावनांना वाट मोकळी केली.
भाजपासोबत युती तोडताना मला या सगळ्या गोष्टीचं दुःख जास्त झालेलं आहे. तुम्ही कोणाला फसवलंत? जो माणूस तुमच्यापाठी पहाडासारखा उभा राहिला, संकटकाळामध्ये पहाडासारखा उभा राहिला. हिंदुत्वावरची सगळी आक्रमणं होती, धोके होते ते त्यांनी स्वतःवरती घेतले. त्या शिवसेनाप्रमुखांच्या पक्षाबरोबर तुम्ही एकत्र राहू शकत नाही? भाजपाने विश्वासघात केला, असंच आता म्हणावं लागेल. कडवट हिंदुत्ववादी पक्षाला तुम्ही दूर ढकललले आणि नको ते पक्ष तुम्ही मांडीवर घेऊन बसलात. हे कसलं हिंदुत्व आहे, अशी टीकाही ठाकरे यांनी केली.
'सरकारचा 'रिमोट कंट्रोल' नेमका कुणाकडे?', उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट
पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांना हाकलण्याचं उगाच श्रेय घेऊ नये, उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला
आशिष शेलारांची पुन्हा शिवसेनेवर टीका, म्हणाले....
एनआरसीचा भाजपातील 'हिंदूनाही' फटका बसणार; उद्धव ठाकरेंचा इशारा
तसेच भाजपसाठी खिडकीची फट, दरवाजे उघडा आहे का, या प्रश्नावर त्यांनी असला प्रकार माझ्याकडे नसतो, असे सांगत भाजपासोबतच्या युतीची शक्यता फेटाळली आहे. जे करायचे ते दिलखुलासपणे, जेव्हा सोबत होतो तेव्हा दरवाजाबाहेर गेलात का? तुम्ही स्वतः गेलात. तुम्ही दरवाजा बंद करून बसलात, असे ठाकरे म्हणाले.