लोकसभा निवडणुकीच्या निकालावर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा अंदाज व्यक्त केला आहे. ही निवडणूक लोकांनी हातात घेतली आहे. यामुळे भाजपला बहुमताचा आकडा गाठणेही कठीण दिसत असल्याचा दावा चव्हाण यांनी केला आहे. यामुळे केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता असल्याचे भाकीत त्यांनी केला आहे.
भाजपला सध्या बहुमताचा 272 चा आकडा गाठणेही अवघड दिसत आहे. गेल्या दोनवेळा सहजपणे त्यांनी हा आकडा गाठला होता. आता देशात आणि महाराष्ट्रात भाजपविरोधी वातावरण दिसत आहे. याचा परिणाम दिसणार आहे. इंडिया आघाडीच्या २४० ते २६० जागा निवडून येतील, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. लोकसत्ता या वृत्तपत्राला पृथ्वीराज यांनी मुलाखत दिली.
महाराष्ट्रावर काय अंदाज...मागील लोकसभेला एमआयएम आणि वंचितची आघाडी होती. यामुळे या दोघांना सहा टक्के मते मिळाली होती. आता ती परिस्थिती नाही. एमआयएमची सोबत नसल्याने वंचितला पूर्वीइतकी मते मिळणार नाहीत, असे मत पृथ्वीराज यांनी मांडले. 'अबकी बार चारसो पार' ही घोषणा मोदींच्याच अंगलट आल्याचे ते म्हणाले. तसेच राज्यात अजित पवारांची एकही सीट येत नसल्याचे ते म्हणाले. शिंदे गटाच्या तीन-चार जागा येण्याची शक्यता आहे. काँग्रेसला १२ जागांवर यश मिळू शकते. राज्यात ठाकरे आणि पवार यांच्या बाजुने सहानुभुतीची लाट आहे. यामुळे राज्यात मविआला ३२ ते ३५ जागा मिळू शकतात, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
बेरोजगारी, भ्रष्टाचार, संविधान बचाव हे मुद्दे प्रभावी ठरत आहेत. या मुद्द्यांवर मोदी आणि भाजपला स्पष्टीकरण देता आलेले नाही. भाजपकडून 2047 सालच्या विकसित भारताची संकल्पना मांडण्यात आली आहे. मात्र त्यांच्याकडे याबाबत स्पष्टता नाही, असे ते म्हणाले.