पुणे : दस-याच्या दिवशी सोने खरेदीच्या बहाण्याने ज्वेलर्स दुकानात जाऊन ४१ हजार रुपयांचे सोने चोरून त्याबाबत बेनटेक्सचे दागिने ठेवून पळ काढणा-या दोन महिलांना खडकी पोलिसांनीअटक केली आहे.
रिझवाना अब्दुल हाकीम शेख उर्फ मुन्नी बेगम अब्दुल रहीम शेख (वय ३०) आणि शबाना बेगम इमरान सय्यद उर्फ परवीन बेगम (वय २७, दोघी रा. सुभाषनगर, गल्ली नंबर १, पिंपरी. मुळ रा. फुलसून नगर, पैठण गेट, औरंगाबाद) अशी अटक करण्यात आलेल्या दोघींची नावे आहेत. याप्रकरणी विनोद राठोड (वय २८, रा. औंध रस्ता) यांनी खडकी पोलिसांत फिर्याद दिली आहे. याबाबत खडकी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक निलेश महाडिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, दस-याच्या दिवशी सोने खरेदीच्या बहाण्याने दोन्ही आरोपी खडकीतील राठोड ज्वलर्समध्ये गेले होते. त्यावेळी त्यांनी फिर्यादी यांना सोन्याची चेन आणि ब्रेसलेट दाखविण्याची मागणी केली. त्यानुसार राठोड यांनी त्यांना विविध प्रकारच्या चेन आणि ब्रेसलेट दाखवले. मात्र त्यावेळी दस-या निमित्त दुकानात असलेल्या गर्दीचा गैरफायदा घेत त्यांनी १४ हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन, आणि २७ हजार रुपये किंमत असलेले सोन्याचे ब्रेसलेट असे एकूण ४१ हजार रुपये किंमतीचे सोने चोरले.
त्यानंतर ख-या सोन्याच्या ठिकाणी त्यांनी बेनटेक्सचे बनावट सोने ठेवले व दुकानाच्या बाहेर पडल्या. हा सर्व प्रकार फिर्यादी यांच्या लक्षात आल्याने त्यांनी दोघींचा पाठलाग केला. मात्र त्या थांबत नसल्याने फिर्यादी यांनी जवळच थांबलेल्या पोलिसांना हा प्रकार सांगितला. त्यानुसार सहायक पोलीस उप निरीक्षक छाया कांबळे आणि त्यांच्या टिमने दोघीना अटक केली. त्यांच्याकडे चोरीचा मुद्देमाल सापडला असून लष्कर येथील चोरीचा एक गुन्हा उघडकीस आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश महाडिक करीत आहेत.