एसटीच्या मदतीला धावली ‘लक्ष्मी’! दुपटीने वाढले महिला प्रवासी, उत्पन्नात १,६०५ कोटींची भर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 09:36 AM2024-03-23T09:36:51+5:302024-03-23T09:37:18+5:30
महामंडळाने १७ मार्च २०२३ रोजी महिला सन्मान योजना लागू केली. महिलांना सर्व प्रकारच्या बसेसमधून अर्ध्या तिकीटात प्रवास करता येतो.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : एकट्या दुकट्या महिलांना गेली कित्येक वर्षे भरवशाची वाटणारी लालपरी सध्या महिलावर्गामध्ये अधिक लोकप्रिय झाली आहे. त्यातच महिला सन्मान योजनेमुळे महिला प्रवाशांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली असून एसटीला लक्ष्मी पावली आहे. एसटी महामंडळाच्या उत्पन्नात तब्बल एक हजार ६०५ कोटींची भर पडली आहे. महामंडळाने १७ मार्च २०२३ रोजी महिला सन्मान योजना लागू केली. महिलांना सर्व प्रकारच्या बसेसमधून अर्ध्या तिकीटात प्रवास करता येतो.
५६ कोटी लाभार्थी
१७ मार्च २०२३ पासून फेब्रुवारी २०२४ पर्यंत महिला सन्मान योजनेच्या लाभार्थींची संख्या ५५ कोटी ९९ लाख ५७ हजार १६१ इतकी झाली आहे.
दरमहा पाच कोटी महिला प्रवासी
सवलत लागू होण्यापूर्वी दरमहा दीड ते दोन कोटींपर्यंत महिला बसने प्रवास करत होत्या आजघडीला त्यांची संख्या पाच कोटींपर्यंत वाढली आहे. गेल्या वर्षभरात एकूण ५५ कोटी ९९ लाख ५७ हजार१६१ महिला प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे. गेल्या वर्षभरात महिला सन्मान योजनेंतर्गत शासनाने प्रतिपूर्ती रकमेपोटी एसटीला तब्बल एक हजार ६०५ कोटी रुपये अदा केले आहेत.