नागपंचमीनंतर येथील महिला एकमेकांना वाहतात शिव्यांची लाखोली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2017 02:22 PM2017-07-28T14:22:35+5:302017-07-28T14:26:43+5:30
‘कुणाला शिव्या देऊ नये’, अशी शिकवण आपल्याला घरात, शाळेमध्ये दिली जाते. पण सातारा जिल्ह्याच्या खंडाळा तालुक्यात चक्क नागपंचमीच्या दुस-या दिवशी एकमेकांना शिव्या देण्याची परंपरा आहे.
लोणंद (सातारा), दि.28 - ‘कुणाला शिव्या देऊ नये’, अशी शिकवण आपल्याला घरात, शाळेमध्ये दिली जाते. पण सातारा जिल्ह्याच्या खंडाळा तालुक्यात चक्क नागपंचमीच्या दुस-या दिवशी शिव्यांची लाखोली वाहण्याचीच परंपरा आहे. शुक्रवारी दुपारी सुखेड-बोरी या दोन गावांतील महिलांनी गावाच्या सीमेवरील ओढ्याजवळ येऊन एकमेकींना शिव्या दिल्या. हा ‘बोरीचा बार’ पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक आले होते.
सुखेड-बोरी या दोन गावांच्या दरम्यान असलेल्या ओढ्यालगत दरवर्षी नागपंचमीच्या दुस-या दिवशी ‘बोरीचा बार’ रंगतो. एकमेकींना शिव्या दिल्या जातात. संगतीला हलगीचा कडकडाट सुरू असतो. दोन्ही बाजूकडील महिलांमध्ये उत्साह संचारतो. अन् प्रतिस्पर्धी गटातील महिलेला ओढून आणले जाते. परंपरागत गुरुवारी दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी ‘बोरीचा बार’ सुरू झाला. तो पाऊण तास चालला. जगावेगळा हा सोहळा पाहण्यासाठी जिल्ह्याच्या विविध भागातून शेकडो लोक दाखल झाले होते. अनेक तरुणांनी हा सोहळा आपल्या मोबाइलमध्येही कैद केला. या सोहळ्यानंतर दोन्ही गावांमध्ये यात्रेला सुरुवात झाली.