मुंबई- लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होऊ शकतात. त्यातच जनमत सरकारच्या विरोधात असल्याने कामाला लागा, असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. मुंबईत शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीची बैठक पार पडली. त्यावेळी झालेल्या भाषणात पवारांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी तयार राहण्यास सांगितलं.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यावर केंद्र सरकारचा कल आहे. त्यामुळे या दोन्ही निवडणुका कधीही होऊ शकतात. त्यामुळे आतापासूनच कामाला लागा, असे आदेश शरद पवार यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. यावेळी शरद पवार यांनी केंद्र आणि राज्यसरकारच्या धोरणांवरही टीका केली. राज्यसरकार सरसकट कर्जमाफी केल्याचं सांगत आहे. सरसकट कर्जमाफी करण्यात आली आहे तर मग ही निकषाची भानगड कशाला ठेवली? असा सवालही त्यांनी केला. सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले असून त्याविरोधात लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. जनमत पूर्णपणे सरकारच्या विरोधात गेलं आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, 5 नोव्हेंबर रोजी औरंगाबादमध्ये शेतीशी निगडीत अधिवेशन घेणार असल्याचं शरद पवार यांनी या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे. तसंच आंदोलनानंतर पुढची दिशा ठरवणार असल्याचं, शरद पवार यांनी म्हंटलं आहे.
महागाईच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेणार असल्याचं शरद पवार यांनी म्हंटलं आहे. देशातील उद्योग धंदे बंद होत असून बेरोजगारी वाढतीये, असंही शरद पवार यांनी पत्रकार परिषदेतमध्ये बोलताना म्हंटलं आहे.
कर्जमाफी जाहीर केली, मग निकषाची भानगड कशाला?शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुनही शरद पवारांनी राज्य सरकारावर निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांनी जर सरसकट कर्जमाफी जाहीर केली असेल तर निकष नावाची भानगड कशाला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
जपानची आर्थिक मंदी कमी करण्यासाठी भारतात बुलेट ट्रेनसामान्य माणूस ज्यातून प्रवास करतो त्यामधील यातना कमी करण्यासाठी प्रयत्न होत नाही. पण बुलेट ट्रेनचे प्रोजेक्ट आणले जातात. जपानमध्ये आज आर्थिक मंदी आहे. सर्वात फास्ट ट्रेन ही जपानमध्ये आहे. फास्ट ट्रेनची कारखानदारी जपानमध्ये आहे, पण त्याला मार्केट नाही. जपान आर्थिक मंदी कमी करण्यासाठी आपल्याकडे बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट सुरु आहे, असं म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.