मुंबई : ‘जैन इंटरनॅशनल आॅर्गनायझेशन’ने (जिओ) आपल्या संघटनेच्या रूपात आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यासपीठ निर्माण केले असून, त्यांचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘जिओ’ संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात ‘जिओ’च्या विविध संचालक आणि विविध पदाधिका-यांना जैन मुनी नयपद्मसागर यांनी शपथ दिली. या वेळी जैन मुनी नयपद्मसागर यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नयपद्मसागर यांनी भारतीय संस्कृतीच्या रक्षणाचे आणि संवर्धनाचे काम हाती घेतले आहे. मी आणि माझ्या मंत्रिमंडळातील सहकारी निश्चितच या कार्यात त्यांच्या सोबत आहोत.जैन धर्माच्या सेवेसोबतच राष्ट्रसेवेचा त्यांचा वसा कौतुकास्पद आहे. भारतीय संस्कृतीने निसर्गातील लहानात लहान जिवालासुद्धा जगण्याचा अधिकार प्रदान केला आहे. त्यामुळेच ही संस्कृृती पाश्चिमात्य संस्कृतीहून श्रेष्ठ आहे. ‘जिओ’ संस्थेच्या माध्यमातून धार्मिक कार्याबरोबरच राष्ट्रीय कार्यही उत्तम प्रकारे केले जात आहे. नैसर्गिक आपत्ती तसेच अन्य संकटांच्या काळात ही संस्था नेहमीच मदतीसाठी तत्पर असते. संस्थेची ही भूमिका कौतुकास्पद असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. नयपद्मसागर यांच्या राष्ट्रसेवेच्या भूमिकेने प्रभावित झाल्यामुळेच मी वारंवार त्यांच्या कार्यक्रमाला येतो, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘जिओ’ संस्थेच्या आंतरराष्ट्रीय मॅगझीनचे प्रकाशनही करण्यात आले.‘जिओ’चे सदस्य जैन धर्माच्या सेवेसोबत महाराष्ट्राचीही सेवा करतील. या माध्यमातून राष्ट्रसेवेत त्यांचे योगदान सुरू राहील, अशी भावना नयपद्मसागर यांनी या वेळी व्यक्त केली. या कार्यक्रमास मुंबई भाजपाध्यक्ष आमदार आशिष शेलार, राज पुरोहित, मंगल प्रभात लोढा, नरेंद्र मेहता, राजेंद्र पाटनी, अमेरिकन डेमोक्रॅट पक्षाचे २०२० मधील अध्यक्षीय निवडणुकीतील एक दावेदार रॉबी वेल्स आदींसह ‘जिओ’ संस्थेचे पदाधिकारी, देशविदेशातील सदस्य उपस्थित होते.
‘जिओ’ संस्थेचे काम प्रेरणादायी, आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यासपीठ निर्माण केले - मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 3:39 AM