मुंबई - माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांना पुन्हा राज्याच्या राजकारणात सक्रिय होण्याचे वेध लागले आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राणे यांना मालवणमधून वैभव नाईक यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. त्याची सल राणे यांच्या मनात असून आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदार संघातून ८० ते ८५ टक्के मतं मिळविण्याचा निर्धार राणे यांनी केला आहे. त्यामुळे विद्यमान आमदार नाईक आणि नारायण राणे यांच्यातील लढत लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.
खासदार राणे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालवणमधील आजी-माजी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी राणे यांनी आपली खंत बोलून दाखवली. मावलणमधून आपण सहा वेळा निवडून आला. मात्र २०१४ मध्ये झालेला पराभव आपल्या जिव्हारी लागला आहे. मागील पाच वर्षांपासून येथे आमदार, खासदार, पालकमंत्री आपला नाही. याचा जनतेनेही विचार करावा. तर आगाणी विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, अशा सूचना राणे यांनी केल्या.
राणे सध्या भाजपच्या पाठिंब्यावर राज्यसभेत खासदार असून त्यांनी स्वाभिमान पक्षाची स्थापना केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राणे यांना युतीकडून किती जागा मिळणार हे अद्याप निश्चित नसलं तरी राणे यांनी तयारी सुरू केली आहे. यावेळी राणे यांनी मतांच्या टक्केवारीचा देखील उल्लेख केला. १९९० पासून आपल्याला ८० टक्के मते मिळाली आहेत. मात्र २०१४ मध्ये यात घट झाली. निलेश राणे यांच्या मताच्या टक्केवारीत ३५ टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे मी आमदार, मंत्री असताना कुठं कमी पडलो का, असा सवालही राणे यांनी उपस्थित केला.