ऑनलाइन लोकमतदुसरबीड, दि. ६ : येथील जिजामाता साखर कारखान्याची १४ हजार १४० साखरेची पोती काढून नेण्याच्या प्रयत्न कामगारांनी ६ मे रोजी कारखाना प्रवेशद्वारावरच रोखला. साखर रोखल्यामुळे पोलिस आणि कर्मचाऱ्यांमध्ये लोटपोट झाली. त्यात १ कर्मचारी गंभीर जखमी झाला. तर ३ कर्मचारी पाल्यांना अटक करण्यात आली. त्यामुळे एकच तणाव या परिसरात निर्माण झाला व परिसराला पोलिस छावणीचे स्वरुप आले होते. जिजामाता शुगर्स मिल प्रा.लि. यांनी सन २०११ मध्ये बुलडाणा अर्बनकडून १० कोटी कर्ज घेतले होते. त्यापैकी जवळपास ५ कोटी कर्जाचा भरणा केला असून ५ कोटी थकबाकी जिजामाता शुगर्स मिलकडे बाकी होते. या अनुषंगाने बुलडाणा अर्बन ने ६ मे रोजी कर्ज वसुलीसाठी पोलिस प्रशासनाचा तगडा बंदोबस्त लावून साखर काढण्याचा प्रयत्न केला. दिलेल्या कर्ज वसुलीसाठी ही मोहीम रितसर परवानगी घेऊन राबविल्या जात होती मात्र सदर माहिती कर्मचाऱ्यांना मिळताच त्यांनी कारखाना दरवाज्यावर नारेबाजी करत त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिस व कर्मचाऱ्यांमध्ये लोटपोट झाली.
त्यात नुरखॉ पठाण हा कर्मचारी गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना जालना येथे हलविण्यात आले. तर अन्सार पठाण, अरुण भुसारी, शे.दस्तगीर या तीन कर्मचारी पाल्यांना अटक करुन स्थानबद्ध केले. घटनास्थळी सरपंच छगन खंदारे व युवा सेनेचे प्रमुख अविनाश चव्हाण यांनी सदर साखर काढण्याच्या आदेशाची प्रत मागितली असता नायब तहसिलदार माळी यांनी २०१३ च्या आदेशाची प्रत दाखवल्याने एकच खळबळ उडाली. त्याच दरम्यान अविनाश चव्हाण यांनी दुरध्वनीद्वारे या संदर्भात आ.शशिकांत खेडेकर यांच्याशी चर्चा केली व सदर आंदोलन थांबविण्यासाठी प्रयत्न केले.या बंदोबस्तात दंगाकाबु पथकातील ४० कर्मचारी, १० पोलिस अधिकारी, १ डीवायएसपी, लेडीज पोलिस २० तर २० पुरुष पोलिसांचा ताफा घटनास्थळी हजर होते. (वार्ताहर)