ग्राहकांच्या हक्कासाठी लढा देणारे कार्यकर्ते हे ‘ग्राहक योद्धे’ - मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 01:44 PM2018-01-10T13:44:45+5:302018-01-10T13:56:50+5:30
ग्राहकांचे प्रबोधन करणे आणि त्यांच्या हक्कासाठी लढा देणारे कार्यकर्ते हे ग्राहक योद्धे आहेत, ग्राहकांना न्याय मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. मंगळवारी (दि. 9) ग्राहक दिनानिमित्त ग्राहक चळवळीत उल्लेखनीय काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
मुंबई : ग्राहकांचे प्रबोधन करणे आणि त्यांच्या हक्कासाठी लढा देणारे कार्यकर्ते हे ग्राहक योद्धे आहेत, ग्राहकांना न्याय मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. मंगळवारी (दि. 9) ग्राहक दिनानिमित्त ग्राहक चळवळीत उल्लेखनीय काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, ग्राहक जागृतीसाठी विविध पातळ्यांवर कार्य होत आहे, ग्राहकांच्या हितासाठी संघर्ष करणाऱ्या ग्राहक योद्धयांच्या माध्यमातून ग्राहकांना न्याय मिळत असतो. बाजारातल्या बदलांचा परिणाम हा ग्राहकांवरही होत आहे. थेट मार्केटिंग , ऑनलाईन मार्केटिंग या क्षेत्रात होणारी फसवणूक टाळता यावी यासाठी प्रबोधन करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी बोलताना ग्राहक संरक्षणमंत्री गिरीश बापट यांनी, ग्राहक हा राजा मानून त्याची फसवणूक होऊ नये यासाठी सर्व स्तरावरून प्रबोधन करण्याचे आवाहन केले. ग्राहक चळवळीत अधिकाधिक लोकांनी सक्रिय व्हावे असेही त्यांनी सांगितले.
ग्राहक चळवळ आणि माहिती अधिकाराद्वारे समाजकार्य करत असणाऱ्या 9 मान्यवरांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला, यात श्रीमती स्वाती विजय भागवत, ( ग्राहक पंचायत कार्यकर्त्या) मु.पो.मंडणगड, जि. रत्नागिरी. धनंजय रावसाहेब गायकवाड ( ग्राहक पंचायत कार्यकर्ते) ता.शिरुर जि.पुणे. संपत जळके. ( ग्राहक पंचायत कार्यकर्ते) तुळजापूर जि.उस्मानाबाद. श्रीमती तृप्ती महेंद्र आकांत. ( ग्राहक पंचायत कार्यकर्त्या) श्रद्धानंद पेठ, नागपूर. जयप्रकाश शालिग्राम पाटील. (ग्राहक पंचायत कार्यकर्ते) अकोला. राघवेद्र प्र.यजुर्वेदी (राव) (माहिती अधिकार कार्यकर्ते) साकिनाका, अंधेरी (पू) श्रीमती इंद्राणी मलकानी, मुंबई (सामाजिक कार्यकर्त्या )भगवान कारीया, मुंबई ( सामाजिक कार्यकर्ता व माहिती अधिकार पाठपुरावा कर्ते )डॉ.मनोहर कामत, मुंबई (ग्राहक चळवळ कार्यकर्ते) यांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर गणितात विशेष पारितोषिक मिळवणा-या अकरा वर्षाच्या अभिषेक अजय राठोड यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.