सलग तिसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
By admin | Published: August 3, 2016 03:33 AM2016-08-03T03:33:51+5:302016-08-03T03:33:51+5:30
सलग तिस-या दिवशी विधान परिषदेत शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीने विधान परिषदेचे कामकाज रोखून धरले.
मुंबई : अखंड महाराष्ट्राच्या मुद्यावरून मंगळवारी सलग तिस-या दिवशी विधान परिषदेत शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीने विधान परिषदेचे कामकाज रोखून धरले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन वेळा तेच निवेदन केले. या निवेदनाने आमचे समाधान झाले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीच अखंड महाराष्ट्राचा ठराव दोन्ही सभागृहात मांडावा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली.
सकाळी कामकाजाला सुरुवात होताच राष्ट्रवादीचे सदस्य सुनील तटकरे यांनी बोलायला सुरुवात केली. विरोधी बाकांवरून अखंड महाराष्ट्राच्या घोषणा सुुरुच राहिल्यामुळे सभापती रामराजे नाईक झ्रनिंबाळकर यांनी सभागृहाचे कामकाज पंधरा मिनिटांसाठी तहकूब केले. त्यानंतर कामकाज सुरु होताच तटकरे यांनी स्थगन प्रस्तावाची सूचना मांडली. राज्याच्या स्थापनेपासून विविध शक्तींनी महाराष्ट्र तोडण्याचे प्रयत्न केले. आता भाजपा सत्तेत आल्यापासून वेगळ्या विदर्भाची चर्चा सुरु आहे.
शुक्रवारी भाजपा खासदाराने लोकसभेत अशासकीय ठरावाद्वारे वेगळ्या विदर्भाचा ठराव मांडला. हा अशासकीय ठराव मांडला तरी तो सत्ताधारी सदस्यांनी मंजूर केला तर तसा ठराव राज्याकडे येऊ शकतो, असे ते यावेळी म्हणाले. त्यामुळे अखंड महाराष्ट्राबाबत चर्चेला परवानगी देण्याची मागणी तटकरे यांनी केली. शेकापचे जयंत पाटील यांनी देखील अखंड महाराष्ट्रावरील चर्चेची मागणी केली. मात्र सभापतींनी ही सूचना फेटाळल्यामुळे विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. चर्चेच्या मागणीसाठी हा गोंधळ सुरूच राहिल्यामुळे चार वेळा सभागृह तहकूब करावे लागले.
ठराव दोन्ही सभागृहात आणा
अखंड महाराष्ट्राचा विषय मांडत असताना चार-चार मंत्री उभे राहून विरोध करत आहेत. ही बाब लाजिरवाणी आहे. जोपर्यंत दोन्ही सभागृहात अखंड महाराष्ट्राचा ठराव मुख्यमंत्री मांडत नाहीत तोपर्यंत आमचे समाधान होणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला. (प्रतिनिधी)
>आता काय छाती
फाडून सांगायचे का?
एरव्ही शांत आणि संयमी असणारे सभागृह नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आज विरोधकांच्या अडवणुकीमुळे संतप्त झाले. वेगळ्या विदर्भाचा कोणताच प्रस्ताव नाही. मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी स्पष्टपणे खुलासा केला आहे. तरीही वारंवार हा विषय सभागृहात मांडून कामकाज रोखले जात आहे. त्यामुळे आता हनुमानासारखे छाती फाडून सांगायचे का, असा सवाल पाटील यांनी विरोधकांना उद्देशून केला.
>मराठी जनतेचा
हा चौथा लढा
स्वातंत्र्यानंतर मराठी जनतेला तीन महत्वाचे लढे लढावे लागले. एक निजामाविरुद्ध, दुसरं पोतुर्गीजांविरुद्ध , तर तिसरा स्वतंत्र महाराष्ट्रासाठी लढावा लागला. आता सत्ताधारी भाजपाच्या भूमिकेमुळं अखंड महाराष्ट्रासाठी चौथा लढा लढावा लागण्याची वेळ आली आहे, असे कॉंग्रेसचे शरद रणपिसे म्हणाले.