अकोल्यातल्या पोरींची कुस्ती
By admin | Published: August 29, 2016 01:22 AM2016-08-29T01:22:56+5:302016-08-29T01:22:56+5:30
सुनीता कडोळे महाराष्ट्र राज्यातील पहिल्या महिला कुस्ती प्रशिक्षक.
अकोला, दि. २८: पुरुषांची मक्तेदारी असलेल्या कुस्ती स्पर्धेत साक्षी मलिकनं अद्वितीय कामगिरी करीत चमत्कारच केला. रिओ ऑलिम्पिकमध्ये देशाला पहिलं पदक साक्षीनं मिळवून दिलं. हरियाणातल्या रोहतकची असलेल्या साक्षीमुळे आज देशाच्या कानाकोपर्यातल्या मुली कुस्तीकडे वळत आहेत. साक्षीसारख्याच अनेक मुली उत्साहाने आखाड्यात उतरत आहेत. अकोल्यासारख्या छोट्या शहरातदेखील अनेक महिला कुस्तीपटू आहेत. सुनीता कडोळे या तर महाराष्ट्र राज्यातील पहिल्या महिला कुस्ती प्रशिक्षक आहेत. सुनीता कडोळे यांनी स्वत:च्या मुलीलादेखील कुस्तीगीर केले. आज अकोल्यातल्या ४५ महिला कुस्तीगिरांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविला आहे.
सुनीता मोरेश्वर कडोळे यांनी सर्वप्रथम अकोल्यात महिलांकरिता कुस्तीची सुरुवात केली. त्यांनी विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धेत सन २00७ मध्ये पहिले सुवर्ण पदक पटकाविले. त्यानंतर २00९ मधील विदर्भ केसरी स्पर्धेतदेखील सुवर्ण पदक पटकाविले.
तसेच विदर्भस्तरीय कुस्ती स्पर्धेत चार रौप्य पदकं मिळविली. श्री मोरेश्वर महिला कुस्ती संस्थेची स्थापना करू न त्याअंतर्गत अनेक मुलींना कुस्तीचे प्रशिक्षण दिले. संस्थेच्या संघाने नागपूर आणि देवळी (वर्धा) येथे झालेल्या विदर्भ केसरी स्पर्धेत द्वितीय क्रमांकाची चॅम्पियन ट्रॉफी मिळविली.
सुनीताताईंनी महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत ८ वेळा अकोला जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. दोन वेळा खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा खेळल्या. या स्पर्धेत संस्थेच्या महिला कुस्तीगिरांनी उत्कृष्ट खेळप्रदर्शन करीत तृतीय क्रमांकाची चॅम्पियन ट्रॉफी पटकाविली. यानंतर सुनीताताईंनी आपली मुलगी माधुरी हिला कुस्तीचे धडे देण्यास सुरुवात केली. दोघी मायलेकी महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा असो की विदर्भ कुस्ती स्पर्धा. एकाच स्पर्धेत एकाच मॅटवर खेळत असत. मायलेकींची कुस्ती बघण्यासाठी स्टेडिअमवर खचाखच गर्दी होत असे. बक्षीसही भरपूर मिळायचे. मायलेकी कुस्तीपटू म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाल्या. या दोघींची प्रसिद्धी बघून इतर महिलादेखील कुस्ती शिकण्यासाठी सुनीताताईंच्या तालीम संघात येऊ लागल्या. त्यांच्या तालमीतील महिला कुस्तीपटूंनी शालेयस्तर स्पर्धेत २५ पदके पटकाविली. अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत खेळप्रदर्शन करीत आठ मुलींनी कलरकोट प्राप्त केले. नॅशनल कॅडेट कुस्ती स्पर्धेतही संस्थेच्या प्रशिक्षणार्थींनी उत्तम खेळप्रदर्शन केले.
पायका (ग्रामीण) कुस्ती स्पर्धेत तीन वेळा उत्कृष्ट खेळप्रदर्शन केले. यामध्ये सुनीताताईंची मुलगी माधुरी हिने राज्य स्तरावर कांस्य पदक पटकाविले. आज संस्थेच्या अनेक मुलींनी कुस्तीच्या भरवशावर पोलीस दलात व सरकारी नोकरीत प्रवेश मिळविला.
शेतमजुरी करणा-या मुली शिकताहेत कुस्ती
मोरेश्वर महिला कुस्ती संस्थेमध्ये कुस्ती खेळण्यास येणार्या प्रत्येक मुलींची वेगळी कहाणी आहे; परंतु एक साम्य सर्वांंमध्ये आहे, ते म्हणजे जवळपास सर्व मुली या शेतमजुरी करणार्या आहेत. दिवसभर शेतीत राबून शालेय शिक्षणाची आवड आणि कुस्तीचं वेड जोपासत आहेत. संस्थेमध्ये ४५ मुली नियमित सराव करतात. या मुलींकडून एक छदामही मोरेश्वर महिला कुस्ती संस्थेच्या अध्यक्ष सुनीता कडोळे घेत नाहीत. सुनीताताईंचे पती मोरेश्वर कडोळे उत्तम कुस्तीगीर असून, सुनीताताईंना त्यांचे नेहमीच प्रोत्साहन लाभते.