यशोमती ठाकूर यांच्या हॅटट्रिकची प्रतीक्षा !
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 01:17 PM2019-07-18T13:17:23+5:302019-07-18T13:18:30+5:30
यशोमती ठाकूर विदर्भातील एकमेव महिला आमदार असून लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यासाठी केलेल्या कामामुळे यशोमती ठाकूर यांचे पक्षातील स्थान आणखी भक्कम झाले आहे.
मुंबई - नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदार संघातून भाजपचे आव्हान मोडून काढण्यात आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांना यश आले. नवनीत राणा यांच्या यशात त्यांचे पती रवी राणा आणि तिवसा मतदार संघाच्या काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांची भूमिका लक्षवेधी ठरली. ठाकूर यांनी राणा यांच्यासाठी संपूर्ण प्रयत्न केले. त्यामुळे राणा यांचा विजय काही प्रमाणात सुकर झाला. त्याचाच लाभ आता ठाकूर यांना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकूर आता हॅटट्रिकची प्रतीक्षा असल्याचे मतदार संघात बोलले जात आहे.
२०१४ विधानसभा निवडणुकीत तिवसा मतदार संघातून यशोमती ठाकूर यांच्यासमोर फारसचे आव्हान नव्हते. भाजपचा मोठा कार्यकर्ता वर्ग आणि सुप्त शिवसैनिक असले तरी २०१४ मध्ये यशोमती ठाकूर यांच्याकडे आपली लेक म्हणून पाहण्यात आले होते. यशोमती ठाकूर विदर्भातील एकमेव महिला आमदार असून लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यासाठी केलेल्या कामामुळे यशोमती ठाकूर यांचे पक्षातील स्थान आणखी भक्कम झाले आहे.
दुसरीकडे नवनीत राणा यांनी आपल्या लोकसभा मतदार संघातील स्थानिक प्रश्नांवर भर देण्यास सुरूवात केली आहे. नुकताच त्यांनी महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला होता. नवनीत राणा यांच्या विजयातील ठाकूर यांची भूमिका महत्त्वपूर्ण होती. त्यामुळे सहाजिकच नवनीत राणा देखील ठाकूर यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार आहेत.
तिवसा मतदार संघातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नवनीत राणा यांचे पती रवी राणा यांनी अनेकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांचा मुद्दा केंद्रस्थानी होती. अर्थात विधानसभा निवडणुकीत देखील शेतकरी प्रश्न गाजणार हे स्पष्टच आहे. रवी राणा यांच्या येथील संघटनामुळे यशोमती यांचा मार्ग सुकर होण्याची शक्यता असली तरी, भाजप-शिवसेनेच्या चालीवर बरच काही अवलंबून राहणार आहे.